Dehu : श्रीक्षेत्र देहूतील शिवजयंती उत्सव समितीने भुकेलेल्याना दिला आधार; भक्ती-शक्तीचा सुरेख संगम

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदी (लॉकडाउन)मध्ये भरडून निघालेल्या रोजंदारीवर पोट भरणाऱ्या मजुरांवर आणि कुटुंबातील आबालवृद्धांवर भूकमारीची वेळ आली आहे. सरकारच्या घोषणांनी त्यांचे पोट भरणार नाही. सरकारी मदतीची वाट न पाहाता देहू येथील शिवजयंती उत्सव समितीने या भुकेलेल्या जीवांना अन्न आणि निवारा दिला आहे.

देशातील काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती पुढाकार घेऊन निराश्रितांना अन्न, वस्त्र आणि आश्रय देत आहेत. देहूच्या शिवजयंती उत्सव समितीच्या शिवभक्तांनी संत तुकाराम महाराजांच्या शिकवणुकीतील भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तीचा मार्ग अवलंबून पीडितांची मदत करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

दरम्यान, राज्य शासनाने श्रीक्षेत्र देहू संस्थानामार्फत वारकरी व निराश्रित लोक जे देहू परिसरात अडकले आहेत त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. अशाच जवळपास 70 ते 80 लोकांना देहूच्या वैकुंठ गमन मंदिराल भक्त निवासात आसरा उपलब्ध करून दिला आहे. शासकीय वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि परिचारिका या निराश्रितांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

तुका भरवितसे घास उदार करे, देव जेविताती परमादरे II
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाला लक्षात घेत, श्रीक्षेत्र देहू येथील शिवजयंती उत्सव समितीच्या शिवभक्तांनी सदर लोकांसाठी तिन्ही वेळ जेवणाची सोय केली आहे. त्यांच्या स्वच्छतेची आणि सुरक्षित अंतराची खबरदारीही देखील घेण्यात येत आहे. लॉकडाउन संपेपर्यंत हा भंडारा चालूच ठेवणार असल्याचा निश्चय मंडळाच्या शिवभक्तानी ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.