Dehu : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला गती; मुख्य मंदिरात पॉलिशचे काम सुरू

एमपीसी न्यूज – अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला देहू येथे वेग आला आहे. जशी-जशी पालखी सोहळ्याची तिथी जवळ येत आहे, तशी-तशी तीर्थक्षेत्र देहुत वैष्णवांची गर्दी आणि कामाची लगबग वाढू लागली आहे. देहुमध्ये हरिनामाचे चैतन्य आतापासूनच जाणवू लागले आहे. पालखी रथ आणि नगारखान्यासाठी बैलजोडी निश्‍चित झाली आहे. मुख्य मंदिरातील कीर्तन मंडपाच्या पॉलिशचे काम सुरू आहे.

पालखी रथाच्या बैलजोडीचा मान यंदा रवींद्र कोंढरे (आंबेगाव बुद्रुक) आणि बाबुराव विधाते (बाणेर) यांना देण्यात आला आहे. तर, नगारखान्याच्या बैलजोडीचा मान राजाराम गाडे यांना मिळाला आहे. मुख्य मंदिरातील पॉलिशचे काम सुरू आहे. मुख्य मंदिरातील कीर्तन मंडपाला पॉलिश करण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्य द्वारावरील चौघडा घराचे काम पूर्ण होत आले आहे. खडकी येथील 512 दारूगोळा कारखान्यात पालखी रथ दुरूस्तीसाठी देण्यात आला आहे.

  • दिंडीप्रमुख आणि वारकऱ्यांशी आवश्‍यक पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाईचे काम केले जात आहे. सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. देहू येथील आणि पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती व्हावी, यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांशी पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख अजित मोरे यांनी दिली.

संत तुकाराम महाराज पालखीचे 25 जूनला शहरात आगमन होणार आहे. पालखीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात असतो. पालखी ज्या मार्गावरून पुढे पुण्याला मार्गस्थ होणार आहे. त्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकामध्ये उड्डाणपुलाचे तसेच केबल टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे या चौकामध्ये रस्ते अरुंद झाले आहेत.

  • तसेच, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौक (मोरवाडी), डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासुन दापोडीपर्यंत मेट्रोचे काम चालू आहे. तेथे देखील रस्ता अरूंद झाला आहे. दरम्यान, या मार्गावरील बॅरिकेट्‌स हटविण्याचे काम सध्या केले जात आहे. आकुर्डी येथील विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिरात 18 तारखेपासून पालखीच्या स्वागताच्या तयारीला सुरवात होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारी, वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय आदी सुविधा केल्या जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.