Dehu : तुकोबांच्या पालखी सोहळ्यात ‘हा’ अवलिया देतोय गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा संदेश

पाच वर्षांपासून पालखीत स्वच्छतेचा संदेश देणारे फूलचंद नागटिळक

(लीना माने)
एमपीसी न्यूज – समाजाला स्वच्छतेचा धडा देत कीर्तनातून समाजपरिवर्तन करणारे संत गाडगेबाबा सगळ्यांनाच परिचित आहेत. संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन सोलापूर येथील लेखक, कलाकार आणि सहृदय माणूस फूलचंद नागटिळक गाडगेबाबांचा वेश परिधान करून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देत आहेत. मागील पाच वर्षांपासून संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्यात ते सहभागी होतात आणि स्वच्छतेचा संदेश देतात. स्वच्छतादूत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

राज्याच्या ग्रामविकासात प्रबोधनकर्त्यांचं कार्य अतुलनीय आहे. ग्रामविकासालाच देशसेवा मानणारे संत आपल्याकडे होऊन गेले. त्यात मग गावक-यांचे आयुष्यभर प्रबोधन करणारे संत तुकडोजी महाराज असोत, की स्वच्छतेचा मूलमंत्र देत आपलं जीवन ग्रामविकासाला समर्पित करणारे संत गाडगेबाबा असोत, संत विचार तसेच लोककलांमधून ग्रामस्वच्छतेचा आग्रह धरीत आहे.

  • फाटका वेश, हाती खराटा आणि डोक्यावर गाडगं असा माझा अवतार पाहून लोक मला काही वेळा वेगळ्या नजरेने बघतात. पोलिसही काही वेळा हटकतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, मी संत गाडगेबाबा यांचा अस्सल भक्त आहे. त्यांचे विचार मी नुसते सांगत नाही. तर रस्ते झाडतो. लोकांच प्रबोधन करुन त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, असे नागटिळक सांगतात. सध्या ते पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले असून गावोगावी लोकांना रसाळ वाणीतून प्रबोधन करत व स्वच्छतेचा संदेश देत जात आहेत.

सोलापूर परिसरातील फुलचंद नागटिळक हे स्वच्छतेचा संदेश पालखीत देत आहेत. माढा तालुक्यातील खैराव हे नागटिळक यांचे गाव आहे. कोणताही वारसा नसतानाही त्यांनी शेती करत ही कला जोपासली. संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी गाडगेबाबांची वेशभूषा करुन ते पंढरीच्या वारीत सहभागी झाले आहे. स्वच्छतेच्या संदेशाबरोबरच ते अभिनेते आणि लेखक देखील आहेत. नागटिळक यांचं वय 50 वर्ष असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. गाडगेबाबा यांच्या वेशात असाच राज्यभर लोकजागर करीत फिरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.