Dehugaon : संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर निर्माण कार्यास आर्थिक मदत करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराजांचे आजपर्यंतचे जगातील सर्वात भव्य मंदिर भंडारा डोंगर येथे निर्माण होत आहे. गुजरात मधील गांधीनगर येथील जगप्रसिद्ध असलेल्या अक्षरधाम मंदिराच्या आधारावर हे मंदिर बनवण्यात येत आहे. मंदिरासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या भव्य मंदिर निर्माणकार्यास भरघोस प्रतिसाद देऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई संत तुकाराम महाराज ट्रस्ट व दशमी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी केले.

रविवारी (दि. 2) भंडारा डोंगर मंदिरात काकडा आरती, महापूजा, हरिपाठ, गाथापारायण झाल्यानंतर कीर्तन महोत्सव पार पडला. हभप जगन्नाथ महाराज पाटील यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगवाणीवर आपल्या सुश्राव्य रसाळ वाणीतून जगन्नाथ महाराज यांनी निरूपण केले. यावेळी गजानन शेलार, हभप रवींद्र महाराज ढोरे, विजयशेठ बोत्रे, संजय माळी, रामभाऊ कराळे, रवींद्रआप्पा भेगडे, शिवाजीराव पवार, मनोहरमामा ढमाले, जोपाशेठ पवार, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

बाळासाहेब काशीद म्हणाले, “जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना या भंडारा डोंगरावर साक्षात विठ्ठलाच्या कृपेने मौल्यवान अभंगवाणी स्फुरली. अशी चैतन्यभूमी, तपोभूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर मागील दोन वर्षांपासून भव्य मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. या मंदिराची लांबी 193 फूट, रुंदी 187 फूट, तर उंची 87 फूट इतकी आहे. मंदिराला तीन कळस असून 14 दरवाजे आहेत. मंदिराचा घुमट 34 बाय 34 असून मंदिराला एकूण पाच गर्भागृहे आहेत. ही गर्भागृहे 13 बाय 13 फूट आकाराची असतील. मंदिरात मुख्यभागी विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल. या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती पाहण्यात मग्न असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांची मूर्ती असेल. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने 900 वैष्णव देवतांच्या मूर्तींचे अत्यंत नक्षीदार कोरीव काम करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात या मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून 20 फूट उंचीपर्यंत काम झाले आहे.

खास राजस्थानी शैलीतील मंदिरे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रकांत सोमपुरा व निखिल सोमपुरा हे या मंदिराचे वास्तुविशारद आहेत. रमेशचंद्र सोमपुरा व परेशभाई सोंपुरा हे कुशल व निष्णात कारागीर आहे. राजस्थान येथील सोमपुरा येथे सुवर्ण तांबूस दगडांमध्ये बुद्धिमान व कुशल कारागिरांनी घडविलेले नक्षीदार व कोरीव खांब ट्रकने भंडारा डोंगरावर आणण्यात येत आहेत. मंदिर निर्माणाचे काम सध्या जलदगतीने सुरू असून काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे, अशी संपूर्ण वारकरी भक्तांची इच्छा आहे. संत तुकोबारायांवर निष्ठा असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम वारकरी भाविक भक्तांनी व दानशुर दात्यांनी उदार अंतःकरणाने सढळ हाताने भरघोस देणगी स्वरुपात अर्थसहाय्य करावे, असेही काशीद म्हणाले.

मंगळवारी (दि. 4) दशमी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील काशीद यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.