Dehugaon: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानपूर्व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

Dehugaon: ashadhi shri sant tukaram maharaj's palkhi sohala harinam saptah begins

एमपीसी न्यूज- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखी सोहळ्याचे 12 जून रोजी प्रस्थान होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी प्रस्थानपूर्व अखंड हरिनाम सप्ताहाला केवळ 14 टाळकऱ्यांसह शनिवारी (दि.6) पासून विविध कार्यक्रमांसह सुरवात झाल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

मात्र यावर्षी नेहमीचा उत्साह व गर्दी असणार नाही. मात्र परंपरेप्रमाणे सर्व पालखीसोहळा पार पडणार आहे. यासाठी संस्थानच्या वतीने जोरदार तयारी सुरू झाली आहे.

भारतासह जगभरात कोविड-19 या विषाणूच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ऐतिहासिक ठरावा असा हा यंदाचा पालखी सोहळा मोजक्याच लोकांच्या समवेत होत आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी सुरवात होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रथेप्रमाणे पहाटे नित्यपुजेसह काकडाआरती, महापूजा झाली.

सकाळी पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज, विठ्ठलरुक्मिणी मंदिर व शिळामंदिरातील महापुजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्थ संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे उपस्थितीत करण्यात आली.

तत्पूर्वी मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांचे व ज्ञानेश्वरी आणि गाथेचे, कलशाचे पुजन करण्यात आले आले. भजनी मंडपाच्या प्रवेशद्वारात जरी पटका, व भागवत धर्माची पताका लावण्यात आली.

कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने अद्याप पालखी सोहळ्याला परवानगी दिलेली नाही. परंतु, संस्थानच्या वतीने केवळ 50 लोकांमध्ये पालखी सोहळ्याचे प्रस्थान करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

यामध्ये संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह, विणेकरी, सेवेकरी असे 42 लोक व 8 पत्रकार यांच्यासह हा सोहळा पार पाडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या परवानगीने हा सोहळा पार पाडला जाणार आहे.

यंदाचा पालखी सोहळा कोविडमुळे प्रतिकूल परिस्थितीत होत असल्याने तो ऐतिहासिक होईल. जेष्ठ वद्य सप्तमी 12 जून रोजी दुपारी दोन वाजता परंपरेप्रमाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संस्थानच्या पदाधिकाऱ्यासह पादुकांचे प्रस्थान होईल.

प्रस्थानानंतर पादुका पालखीत मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी पुन्हा जेष्ठ शुध्द दशमी 30 जूनपर्यंत भजनी मंडपात ठेवण्यात येणार आहे. 30 जुनला शासनाच्या सुचनेनुसार किंवा शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधेनुसार त्याच दिवशी पालखी पंढरपुरकडे रवाना होईल.

तो पर्यंत भजनी मंडपात पालखी सोहळ्यात ज्या प्रमाणे नित्य कार्यक्रम होतात तसे सर्व कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. पालखी 30 जुनला पंढरपूर येथे पोहोचेल.

दि. 1 जुलै रोजी एकादशीच्या दिवशी पादुका नगरप्रदक्षिणेसाठी जाईल. त्यावेळी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना चंद्रभागा नदीमध्ये स्नान घालण्यात येईल.

यानंतर पालखी पंढरपूर गोपाळपूर येथील श्री संत तुकाराम महाराज मठामध्ये विसावतील. पौर्णिमेच्या दिवशी प्रथेप्रमाणे गोपाळपुरा येथे सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन व महाप्रसाद होईल पादुका पांडूंरग व संत भेट घेतील व त्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला निघेल.

त्याच दिवशी दुपारनंतर पादुका श्री क्षेत्र देहूगाव येथे पोहचतील. पादुका पंढरपूरवरून आल्यानंतर श्री क्षेत्र देहूगाव येथील भजनी मंडपात ठेवण्यात येतील. येथे नित्यपुजा पाठ व भजन नित्यनियमाने होतील.

वद्य एकादशी 16 जुलै रोजी पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिणेसाठी निघेल. पालखी मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून या ठिकाणी उपस्थितांना नारळ प्रसादाचे वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.

यंदा पालखी प्रत्यक्षात पंढरपूरला नेण्यात येणार नसली तरी सालाबादप्रमाणे पालखी सोहळ्याची तयारी म्हणून 12 जूनला संपूर्ण मंदिर, पालखी रथ व पालखीला फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

या पालखी सोहळ्याची तयारी म्हणून मंगळवारी 8 जूनला पालखी, पालखी रथ, महाराजांच्या पादुका, अब्दागिरी, पुजेचे थाळ, चौरंग, पाट, गरूडटक्के, मंदिरातील प्रभावळ, चांदीचे दरवाजे यांना चकाकी देण्यात येणार आहे.

यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी सर्व दिंडीचालक मालक व फडकऱ्यांना पत्रव्यवहाद्वारे माहिती दिली असून प्रत्यक्ष मोबाईलवर देखील संपर्क साधून पालखी सोहळ्याची माहिती दिली आहे.

प्रत्येकाने पिंपळ, वड किंवा कडूनिंबाचे झाड लावावे
यंदाचा पालखी सोहळा प्रतिकूल परिस्थितीत व वेगळा पध्दतीने साजरा होत असल्याने वारीतील सहभागी होत असलेल्या प्रत्येक दिंडी चालकांनी आपापल्या गावी, आपआपल्या घरांमध्ये व मंदिरांमध्ये दिवे लावून भागवत धर्माची पताका लावावी.

घराघरात गाथेचे व ज्ञानेश्वरीचे पूजन करून पालखी सोहळ्याप्रमाणे नित्य पुजापाठ व भजन करावे. हे करत असताना कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी शासनाने सांगितलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घराशेजारील मोकळ्या जागेत किंवा शेतात पिंपळ, वड किंवा कडूनिंबाची झाडे लावून त्याला प्रतिकात्मक पांडूरंग किंवा पंढरपूर येथील मंदिर समजून प्रदक्षिणा घालाव्यात.

या माध्यमातून निसर्गसंवर्धन देखील होईल व पर्यावरणाचे रक्षण हा संदेश देखील सर्वत्र पोहोचविण्याचे आवाहन श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असलेल्या 335 दिंडी चालकांना संस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

अशाच पध्दतीने इतर पालखी सोहळ्यातील सहभागी दिंडीचालकांनी देखील कृती करावी. भविष्यात हेच वृक्ष आपातकालीन परिस्थितीतील आठवणीतील पालखी सोहळ्याची साक्ष देतील यासाठी हे वृक्ष संवर्धन करावेत असे आवाहन माणिक महाराज मोरे यांनी अवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.