Dehugaon : भंडारा डोंगर हा संत तुकोबारायांच्या अंतःकरणातील स्थान -हभप उमेशमहाराज दशरथे

एमपीसी न्यूज – जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या सर्व परमार्थाचा प्रारंभ भंडारा डोंगरापासून झाला आहे. भंडारा डोंगर हे महाराजांच्या अंतःकरणातील स्थान आहे. तुकाराम महाराज यांचे 21 वर्ष संसारी जीवन, 14 दिवस साधक जीवन आणि उर्वरित संपूर्ण आयुष्य परिपूर्ण संतजीवन आहे. तुकोबाराय संसारातही यशस्वी झाले आणि परमार्थात देखील यशस्वी झाले, असे प्रतिपादन वारकरीरत्न हभप उमेश महाराज दशरथे यांनी केले.

माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त दशरथे महाराज यांची कीर्तनसेवा झाली. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, भंडारा डोंगर दशमी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, तसेच समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

‘लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. आखई चुडा हाती आला, आंकन मोती नाकाला. बोध मुरारी शृंगारीला, चौ-यांशीचा शिक्का केला. तुका तुकी उतरला, सहनतेचा कौल दिला’ या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर दशरथे महाराजांनी निरूपण केले. ‘माणसे जीवनात मान, श्रीमंती, पैसा, बंगला ही प्रतिष्ठा मानतात. परंतू तुकाराम महाराजांनी धगधगीत वैराग्य जपले. संसार अगदी रसातळाला गेला तरी समाधान ठेवले आणि यशस्वी झाले’, असेही दशरथे महाराजांनी सांगितले.

भंडारा डोंगर मंदिरात पहाटे काकडा आरती झाली त्यानंतर अभिषेक, महापूजा, हरिपाठ आणि गाथा पारायण झाले. गाथा पारायणाचे नेतृत्व जालना जिल्हयातील वाकळणी येथील संत विद्यापीठाचे प्रमुख गाथामुर्ती हभप नाना महाराज तावरे हे करीत आहेत. तावरे महाराजांच्या रसाळ व नादब्रह्म गायनशैलीमुळे सामूहिक गाथा पारायणातून डोंगरावर चैतन्याची अनुभूती येत आहे.

गाथा पारायणासाठी मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश राज्यातील हजारो भाविक सहभागी झाले आहेत. भंडारा डोंगरावर दशमी सोहळ्यासाठी येणा-या सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जात आहे. यासाठी मावळ, मुळशी, खेड, हवेली तालुक्यातून भाविक भक्त प्रसादासाठी सहकार्य करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.