Dehugaon : सोसायटीतल्या पिंपळाच्या झाडाला आग

एमपीसी न्यूज – देहूगाव येथील एका सोसायटीमध्ये पिंपळाच्या झाडाला आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास सिद्धिविनायक सोसायटीमध्ये घडली. अग्निशमन विभागाच्या हद्दीच्या वादात आग विझवण्यास विलंब झाला असून तळवडे अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

सब ऑफिसर ज्ञानेश्वर भालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री विजयादशमी निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम शहरात सर्वत्र होता. त्यासाठी सर्व अग्निशमन विभागांनी बंब विविध ठिकाणी स्टँडबाय लावून ठेवले होते. त्यावेळी देहूगाव मधून एका सोसायटीमध्ये पिंपळाच्या झाडाला आग लागल्याची वर्दी मिळाली. माहिती मिळताच तात्काळ तळवडे अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल करून काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पिंपळाच्या वाळलेल्या फांद्यांना आग लागली होती. त्यावेळी ओल्या फांद्यांमुळे धूर मोठ्या प्रमाणात झाला होता. आगीवर नियंत्रण मिळवताच सर्व परिस्थिती आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

देहूगाव हे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत येत नाही. तरीही स्थानिक नागरिकांच्या आग्रहामुळे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तळवडे अग्निशमन विभागाने आग विझवली आहे. नागरिकांची आगीपासून सुरक्षितता ही अग्निशमन विभागाची प्राथमिक जबाबदारी असल्याने काही वेळेला हद्दीबाहेर जाऊन देखील काम करावे लागते, असेही भालेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.