Dehugaon News : युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती विषयी जनजागृती आवश्यक: धनराज पिल्ले

एमपीसी न्यूज – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग कोविड – 19 सोबत लढत असुन या काळामध्ये शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व सर्वांना कळले आहे. विशेषतः उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या युवा पिढीला निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व पटवून देत शारीरिक तंदुरुस्ती विषयी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक असून त्यानिमित्ताने बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने या विषयी आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय वेबिनार निश्चितच सर्वांसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रिसेंट ट्रेंडस इन लाईफ स्टाईल अँड हेल्थ मॅनेजमेंट’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार, सहसचिव आत्माराम जाधव, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, प्रा. विद्या पाठारे आदी उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या तिसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये सौदी अरेबिया येथील किंग फहाद विद्यापीठातील डॉ. कौकब अझीम यांनी ‘लाइफस्टाइल अँड हेल्थ मॅनेजमेंट’ या विषयावर मार्गदर्शन करताना उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली अशी त्रिसुत्री स्पष्ट करत निरोगी आरोग्याचे पैलू, लठ्ठपणा – वस्तुस्थिती व संख्यात्मक विश्लेषण, निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी आवश्यक जीवनशैली याबद्दल माहिती दिली. तसेच विविध देशांमधील लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजारांची आकडे व कारणे, तंदुरुस्त आरोग्यासाठी अमेरिकन हर्ट असोसिएशनने केलेल्या शिफारशी विशद करत उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची माहिती दिली.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातील डॉ. सुमन पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या तिसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. ज्ञानेश्वर चिमटे व प्रा. अमृता इनामदार यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली तर प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

चौथ्या तांत्रिक सत्रामध्ये लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन ग्‍वालियर (मध्य प्रदेश) येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष फुलकर यांनी ‘बॉडी अँड माइंड फिटनेस’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या शरीर तेच प्राप्त करतं जे मन ठरवतं, असे नमूद करत शरीर व मनामधील परस्पर संबंध स्पष्ट केला. तसेच निरोगी आरोग्याचे आहार, विहार, आचार, विचार व व्यवहार या पाच स्तंभावर प्रकाश टाकत उपस्थितांना विशेषतः विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी स्वंय व्यवस्थापनाचे धडे दिले. याप्रसंगी चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मधील डॉ. सोपान कांगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या चौथ्या तांत्रिक सत्रामध्ये प्रा. पोर्णिमा काळे व डॉ. वैशाली बनसोड यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली तर प्रा. विवेक भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

पाचव्या व अंतिम सत्रामध्ये प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित राहिलेल्या चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मधील डॉ. श्रद्धा नाईक यांनी ‘हेल्थ हॅक्स फॉर फंक्शन लाइफस्टाइल’ या विषयावर माहिती देताना निरोगी आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असे नमूद करत शारीरिक तंदुरुस्ती विषयीच्या विविध घटकावर सविस्तर भाष्य केले. या सत्रामध्ये डॉ. सीमा चौहान यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली तर डॉ. सतीश एकार यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.