Dehugaon News : संविधानामुळे देशात एकसूत्रता आणणे शक्य झाले: डॉ. नरेंद्र जाधव

एमपीसी न्यूज – संविधान निर्मिती प्रक्रियेला स्वातंत्र्यापुर्वी पासुनचा इतिहास असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरीव योगदानातुन संविधान अंमलात आले आहे. भारतातील सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचा कणा संविधान असुन धर्म, भाषा, प्रांत अशा विविधतेने नटलेल्या भारत देशामध्ये संविधानामुळे एकसूत्रता आणणे शक्य झाले, असे प्रतिपादन प्रख्यात अर्थतज्ज्ञ व राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या विविध शाखांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित अनंत व्याख्यानमालेत ‘निर्मिती भारतीय संविधानाची व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार, सहसचिव आत्माराम जाधव आदी उपस्थित होते.

व्याख्यानमालेचे प्रास्ताविक मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम यांनी सर्वप्रथम केले. या प्रसंगी डॉ. नरेंद्र जाधव यांनी भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया विस्तृतपणे मांडत त्याचे स्वरूप स्पष्ट केले. तसेच भारताबरोबर संविधान स्वीकारलेल्या अनेक लोकशाही देशांमध्ये सध्याची संविधानाची अवस्था व त्यामध्ये झालेल्या बदला विषयी माहिती देत भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकला. शैक्षणिक धोरण व कोरोना महामारी नंतरचे शिक्षण याविषयी बोलताना कुटुंब कलह, आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय ध्रुवीकरण, सायबर सेक्युरिटी या गोष्टींचा शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहे असे नमूद करत शैक्षणिक धोरण 2020 ची वैशिष्ट्ये व आवश्यक सुधारणा यावर आपल्या अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव आत्माराम जाधव, प्राचार्य डॉ. नितिन घोरपडे, प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी जाती आधारित आरक्षण, कंत्राटी तत्वावरील प्राध्यापक भरती, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर खुलेपणाने चर्चा करत या प्रश्नांना राज्यसभेमध्ये शुन्य प्रहरात मांडण्याची भुमिका घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर तर आभन प्राचार्या डॉ. सुषमा भोसले यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.