Dehugaon News : अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांना आरोग्य विमा संरक्षण

एमपीसीन्यूज : श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी संस्थेच्या वतीने युनियन बँक ऑफ इंडिया पुरस्कृत मणिपाल सिग्ना या कंपनीची कुटुंब आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली. दरवर्षी या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे विम्याचे हप्ते संस्थेच्या माध्यमातून देण्यात येतील, असे संस्थेचे अध्यक्ष सुनील कंद व सचिव विकास कंद यांनी सांगितले.

या आरोग्य विमा योजनेअंतर्गत सर्व प्रकारांच्या आजारावर वैद्यकीय उपचारांसाठी कुटुंबातील एकूण चार व्यक्तींसाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दहा लाखांपर्यंत संरक्षण मिळणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह देशातील सुमारे तीन हजार पेक्षा जास्त हॉस्पिटलचे वैद्यकीय उपचार या योजनेअंतर्गत घेता येतील.

विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटकाळात जर कुटुंबातील व्यक्ती कोरोनाने बाधित झाली तर कोरोनावरील उपचारांसाठी या विमा योजनेचा लाभ होणार आहे. तसेच अपघाती निधन झाल्यास विमाधारकास रुपये पाच लाख तर कुटुंबातील इतर सदस्यांचे अपघाती निधन झाल्यास रुपये दोन लाख पर्यंत रक्कम मिळतील.

आजच्या या कोरोनाच्या संकटकाळात कोरोनाच्या उपचारांसाठी लाखो रुपये काही कुटुंबांनी घालविले आहेत. या उपचारांसाठी अक्षरश: कर्जबाजारी होऊन कित्येक परिवाराची आर्थिक घडी विस्कटली आहे. भविष्यातील जगण्याचा प्रश्न या अडचणीचा संघर्ष करणाऱ्या प्रत्येक माणसासमोर पुढे उभा आहे.

या संकटकाळात व भविष्यातील गरज लक्षात घेऊन ज्ञानदानाच्या पवित्र कार्य समर्पित भावनेने करणारा शिक्षक हा समाज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. या शालेय व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीचे कार्य सेवेचे आहे. एक आदर्श नागरिक व देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात या सर्वांचे जीवन कार्यरत आहे. हे लक्षात घेऊन सृजन फाउंडेशनच्या माध्यमातून अभंग इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींना आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले.

शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांसाठी संस्थेच्यावतीने कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर यांनी संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करून इतर सर्व शिक्षण संस्थांनी देखील या कार्याचा आदर्श घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांसाठी आरोग्य विम्याची तरतूद करावी, अशी भावना व्यक्त केली.

मणिपाल सिग्ना या विमा कंपनीचे पुणे विभागाचे अधिकारी रुपेश पाटील व शाखा प्रमुख गिरीश चौधरी यांच्या हस्ते आरोग्य विमा योजनेची प्रमाणपत्रे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.