Dehugaon News : महाराष्ट्राचा वारसा खूप मोठा आहे फक्त आपल्याला आरसा व्हायला हवं – संजय आवटे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचा वारसा खूप मोठा आहे.  हा वारसा आधी आपल्याला माहीत असेल तरच आपण तो पुढच्या पिढीला सांगू शकतो. म्हणूनच हा वारसा दाखविणारा (Dehugaon News)आरसा आपल्याला व्हायला हवं. निरक्षर लोकांच्या तोंडांत संतांचे अभंग आहेत. पण, नव्या पिढीपर्यंत हे पोहचविण्यात आपण अपयशी ठरतोय. आपला संतांचा, महापुरुषांचा वारसा खूप मोठा आहे, पण आरसाच माहीत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लेखक संजय आवटे यांनी केले.

श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने आयोजित केलेल्या सृजनदीप व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची समृद्धता, महाराष्ट्राचे वेगळेपण तुकोबांच्या ओव्यांमधून सांगत आवटे यांनी पालकांशी सुसंवाद साधला.

 

Bye Election News : कसबा, चिंचवडसाठी शिवसेना आग्रही; पण…

इतर देशांच्या तुलनेत प्रचंड लोकसंख्या असलेला महाराष्ट्र महाकाय मानावा लागेल. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे म्हणत जाती, धर्म, पंथ, भाषा, पेहराव, उपासना पद्धती याबाबतीत असणारे महाराष्ट्राचे वैविध्य, वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्र समजून घेताना भारतही समजून घ्यायला हवा. भारताच्या संविधानातील आम्ही भारताचे लोक ही आमची ख्याती आहे. आमचे वैशिष्ट्य आहे.

बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वचि माझे’ घर हा विचार मांडला. त्यावेळी अमेरिकेचा जन्मही झाला नव्हता. म्हणजेच पूरोगामित्वाच्या विचारांची परंपरा किती प्राचीन आहे, हेच आपले सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. संत तुकारामांची नाळ ही पुढे आंबेडकरांपर्यंत जोडलेली आहे.

महाराष्ट्र हा संतांचा आहे. त्यामुळे संतांचे बोट सोडता कामा नये. प्रेम आणि समतेचा विचार मांडणारी ही संतपरंपरा तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांनाही विसरून चालणार नाही. शिवबा, ज्योतिबा, बाबासाहेब यामध्ये एक सूत्र आहे आणि हे सूत्र कोणत्याही जातीचे नसून समानता व प्रेमाचं आहे. सर्वसामान्य माणसाला‌ आवाज असला पाहिजे हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे.

Pimpri Crime News : अल्पवयीन मुलीशी व आईशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

महिला, मुली ज्या संख्येने महाराष्ट्रात प्रगती करत आहेत, हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. संत कान्होपात्रा, जनाबाईंनी जे विद्रोहात्मक अभंग लिहिले हे महिलांचे योगदान, सामर्थ्य लक्षात घेतलं पाहिजे. व्यसन, अंधश्रद्धा, कर्मकांड यावर संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी त्याकाळात प्रबोधन केले. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. हे सांगताना आवटे म्हणाले की आपण बाहेर गप्पा मारतो पण, मुलांशी बोलत नाही. आताच्या काळाची माध्यमे बदलली आहेत. नव्या पिढीशी बोलताना त्यांच्या माध्यमांत बोलले पाहिजे.

आता गुरुपौर्णिमा बंद होऊन गुगलपौर्णिमा सुरु होईल की काय . महाराष्ट्राने नेहमीच परिवर्तनाचे नेतृत्व केले आहे. पूरोगामित्वाला रोखले आहे. माणूस होण्याची परंपरा आपण सुरु ठेवली पाहिजे. आजच्या व्यवस्थेला नवा विचार मांडणारी माणसं हवी आहेत ,अशा परखड शब्दांत  आवटे यांनी पालकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी- चिंचवड शहर संघ कार्यवाहक, सनदी लेखापाल माहेश्वर मराठे यांनी भूषविले. याप्रसंगी देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा  शितल हगवणे, माजी सरपंच मधुकर कंद, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे, कवी अरुण बो-हाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देहूरोड गटाचे संघ कार्यवाहक नरेश गुप्ता, रोटरी क्लब देहूचे माजी अध्यक्ष संजय भसे, उद्योजक संपत शेटे, आदर्श शिक्षक सचिन ढोबळे, उद्योजक सोमनाथ बोडके, तानाजी काळभोर,  आप्पासाहेब काळभोर उपस्थित होते.

प्राचार्या डॉ.कविता अय्यर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सृजन फाऊडेशनचे संचालक सौरभ कंद यांनी प्रमुख वक्ते  संजय आवटे यांचा रसिक श्रोत्यांना परिचय करून दिला. सहशिक्षिका योगिता नांगरे यांनी सूत्रसंचालन तर सहशिक्षिका मोनिका सूर्यवंशी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.