Dehugaon News: संत तुकाराम महाराज बीज सोहळा 50 भाविकांच्या उपस्थितीत होणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज बीज सोहळा 50 भाविकांच्या उपस्थितीत होणार यावा. सोहळ्यास उपस्थित असलेल्या 50 भाविकांची कोरोना चाचणी करून त्यांची यादी पोलीस प्रशासनाकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या 30 मार्चला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी देहूत येत असतात. बीज सोहळ्याच्या दहा दिवस अगोदर गावात जागोजागी गाथा पारायण सोहळे सुरू होतात.

बीज सोहळ्यासंदर्भात मंगळवारी देहूत आढावा बैठक झाली. शासनाला संस्थानच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल. ज्याप्रमाणे पालखी सोहळा संपन्न झाला. त्याप्रमाणे बीज सोहळा शासनाच्या आदेशानुसार आणि संस्थानच्या परंपरेनुसार होईल, असे संस्थानने सांगितले.

हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी संस्थानचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार बीज सोहळ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश संस्थानला प्राप्त झाले आहेत. या आदेशात परराज्यातून येणाऱ्या भाविकांना न येण्याचे आवाहन संस्थानतर्फे करावे.

बीज सोहळा घरी बसून भाविकांना पाहता येईल याची व्यवस्था करावी. पोलिस आयुक्तांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973नुसार प्रतिबंधात्मक आदेश पारीत करावेत. स्थानिक पोलिस ठाण्याच्या मार्फत पासेस देण्याची व्यवस्था करावी.

तसेच यात्रा काळात प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार गीता गायकवाड, मधुसूदन बर्गे यांना इन्सिडंट कमांडर म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.