Dehugaon News : देहूच्या वेशीवर वारकऱ्यांचे आंदोलन; तुकाराम बीज सोहळ्यास देहूगावात येऊ देण्याची वारकऱ्यांची मागणी

एमपीसी न्यूज – तुकाराम बीज सोहळ्यासाठी तसेच यापुढील सर्व वाऱ्यांसाठी देहूगावात वारकऱ्यांना येऊ द्यावे, तसेच वारकऱ्यांच्या पायी वाऱ्यांना सशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी करत सुमारे 200 वारकऱ्यांनी सोमवारी (दि. 29) देहूगावच्या वेशीवर भजन म्हणत आंदोलन केले. पोलिसांशी चर्चा करून निवेदन दिल्यानंतर वारकऱ्यांनी आंदोलन थांबवले.

तुकाराम बीज (मंगळवार, दि. 30) सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूगावात येत असतात. तसेच आषाढी, कार्तिकी वारीला देखील देहूनगरी वारकऱ्यांच्या येण्याने गजबजून जाते. मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लावले असून यंदाची तुकाराम बीज अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

शासनाच्या या निर्णयाचा वारकऱ्यांनी विरोध केला आहे. वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी सोमवारी (दि. 29) देहूगावच्या वेशीवर आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार राज्याच्या विविध भागातून सुमारे 200 वारकरी सोमवारी दुपारी देहूनगरीच्या वेशीवर दाखल झाले. सामाजिक अंतर राखून शिस्तबद्धरित्या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करून आंदोलन केले.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले, “तुकाराम बीज आणि यापुढील आषाढी, कार्तिकी वाऱ्या नियमित करू द्याव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बंधने असावीत, पण पायी वाऱ्या करू द्याव्यात अशी वारकऱ्यांची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन देखील वारकऱ्यांनी आज पोलिसांना दिले आहे. त्यांची मागणी शासन दरबारी पाठवली जाईल. पुढील वारीच्या वेळी शासन योग्य निर्णय घेईल. पोलिसांना निवेदन दिल्यानंतर आणि चर्चा केल्यानंतर वारकऱ्यांनी आंदोलन थांबवले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.