Dehugaon News : इंद्रायणी घाटावर निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला सोन्याचा दागिना

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीच्या घाटावर देहूगाव येथे निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाला. निर्माल्य विसर्जित केल्यानंतर त्यात सोन्याचा दागिना असल्याचे आठवल्याने त्या व्यक्तीने पाण्यात उडी मारली अन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास संत तुकाराम महाराज मंदिराच्या पायथ्याशी घडली.

विष्णू सर्जेराव पाटील (वय 35, रा. सदगुरु हाऊसिंग सोसायटी, देहूगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू पाटील, त्यांचा भाऊ शंकर सर्जेराव पाटील (वय 42) आणि मित्र राहुल सतप्पा पाटील (वय 29, सर्व रा. सदगुरु हाऊसिंग सोसायटी, देहूगाव) असे तिघेजण रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास देहूगाव येथे संत तुकाराम महाराज मंदिराच्या पायथ्याशी इंद्रायणी नदीच्या घाटावर गणपतीचे हार व फुले आदी निर्माल्य पाण्यात विसर्जन करण्यासाठी गेले होते. विष्णू यांनी निर्माल्य भरलेली प्लास्टिकची पिशवी पाण्यात विसर्जित केली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की निर्माल्याच्या पिशवीमध्ये सोन्याचा दागिना आहे.

त्यानंतर विष्णू यांनी पाण्यात उडी मारली आणि पिशवी काढण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते पाण्यात बुडू लागले. आपला भाऊ पाण्यात बुडत असल्याचे शंकर पाटील यांनी पाहिले आणि भावाला वाचविण्यासाठी शंकर यांनी नदीत उडी मारली. शंकर यांना दम लागला असल्याचे पाहून त्यांचा मित्र राहुल यांनी पाण्यात उडी मारली आणि विष्णू व शंकर या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शंकर व राहुल या दोघांना दम लागल्याने ते दोघे नदीच्या किनारी आले. विष्णू हे नदीत बुडाले. देहूरोड पोलिसांनी स्थानिक नागरिक, नदीत बोटिंग करणारे यांच्या मदतीने विष्णू यांचा शोध सुरू केला.

सोमवारी पीएमआरडीए मारुंजी रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीमच्या पथकांनी शोधकार्य सुरू केले आहे. विष्णू यांचा इंद्रायणी नदीत शोध सुरू आहे

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.