Dehugaon : जातीभेद विरहित समाज हेच वारकरी संप्रदायाचे प्रमुख उद्दिष्ट -हभप संजयमहाराज धोंडगे

एमपीसी न्यूज – ‘यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर’ या जगद्गुरू संत तुकोबारायांच्या अभंगवाणी प्रमाणे जात, वर्ग, धर्म, लिंग, वय असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव वारकरी संप्रदायात दिसत नाही. केवळ पांडुरंगा चरणी असणारी श्रद्धा व भक्ती दिसते. खऱ्या अर्थाने वारकरी संतांनी जातिभेद पहिला बाजूला केला. म्हणूनच संत व्यापक आहेत. जातीभेद विरहित समाज हेच वारकरी संप्रदायाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे, असे प्रतिपादन हभप संजयमहाराज धोंडगे यांनी भंडारा डोंगर येथे केले.

माघ शुद्ध दशमी सोहळ्याच्या निमित्ताने हभप संजय नाना महाराज धोंडगे यांची कीर्तन सेवा झाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपल्या रसाळ सुश्राव्य वाणीतून निरूपण करताना हभप संजय नाना महाराज धोंडगे यांनी सांगितले की, ‘संसार हा व्यर्थ आहे. संसारात कितीही वेळ दिला, श्रम केले तरी ते व्यर्थ आहे. उपजीविकेचे पुरता संसार जरूर करा. पण इतर वेळेत रोज नित्यनियमाने साधना, परमार्थ करा.’

कीर्तनासाठी पिंपरी-चिंचवड, हवेली, खेड, मावळ, मुळशी तालुक्यातील तसेच परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नेहमीपेक्षा भाविकांची भंडारा डोंगरावर दिवसभर दर्शनासाठी गर्दी झाली होती. हजारो भाविकांनी पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री महाराजांच्या सुश्राव्य अमृतवाणीतून जगद्गुरु तुकाराम महाराज भावविश्व निरूपण जीवन कथेचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी उपस्थित राहून जीवन चरित्र कथेचा आस्वाद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.