Dehugaon: पथनाट्याच्या माध्यमातून रुबेला,गोवर लसीकरणासंदर्भात जनजागृती

एमपीसी न्यूज – गोवर निर्मूलन करण्यासाठी आणि रूबेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एमआर’ लस 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना टोचून घेण्यासंदर्भात  येत्या सोमवारी (दि.26)देहूगावात जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. सुमारे अडीच ते तीन हजार शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रभातफेरी, पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाची जनजागृती करणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.

‘एमआर’ लसीकरणाची मोहिम 27 नोव्हेंबरपासून राज्यात सर्वत्र सुरू होणार आहे. ही लस शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र येथे मोफत दिली जाणार आहे. या लसीकरणाच्या  जनजागृतीसाठी देहूगावातील सरकारी, खासगी शाळेतील सुमारे अडीच ते तीन  हजार विद्यार्थी सोमवारी सकाळी प्रभात फेरी काढणार आहेत. त्यानंतर कन्या शाळेतील मैदानावर विद्यार्थी ‘एमआर’ लसीकरणाचे महत्व पथनाट्याच्या माध्यमातून पटवून देणार आहेत. याप्रसंगी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, देहूगावच्या सरपंच उषा चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

‘एमआर  लसीकरणाच्या जनजागृती मोहिमेमध्ये राज्यात प्रथमच देहूगावात मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. गोवर एक प्राणघातक आजार आहे. गोवरमुळे न्युमोनिया, अतिसार, अन्य प्राणघातक धोके होऊ शकतात. तर गर्भावस्थेत रूबेलाचा संसर्ग झाल्यास नवजात शिशुमध्ये अंधत्व, बहिरेपणा, मतिमंदत्व, जन्मजात ह्दयरोग आदी आजार होण्याची शक्यता आहे’. त्यामुळे 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ‘एमआर’ लस टोचून घेणे गरजेचे असल्याचे’ डॉ. किशोर यादव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.