Dehugaon: प्रभात फेरी, पथनाट्यातून रूबेला, गोवर लसीकरणाची जनजागृती

एमपीसी न्यूज – प्राथमिक आरोग्य केंद्र देहूगाव, कर्तव्य फाऊंडेशन, बारा खासगी व सरकारी शाळा, बावीस अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रूबेला, गोवर लसीकरण संदर्भात प्रभात फेरी, पथनाट्याच्या माध्यमातून देहूगावात सोमवारी जनजागृती करण्यात आली. या  मोहिमेमध्ये तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी सहाशे मुलींनी आकर्षक असे इंग्रजीमध्ये ‘एमआर’ हे अक्षर काढले. 

गोवर निर्मूलन करण्यासाठी आणि रूबेलावर नियंत्रण  ठेवण्यासाठी ‘एमआर’ लस 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना टोचून घेण्यासंदर्भात सोमवारी देहूगावातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर कन्या विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. याप्रसंगी हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, देहूगावच्या सरपंच उषा चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ. रणजित कांबळे, कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एमआर’ या लसीकरण मोहिमेला मंगळवारपासून राज्यात सर्वत्र सुरूवात झाली आहे.  ही लस शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र येथे मोफत दिली जात आहे.

”गोवर एक प्राणघातक आजार आहे. गोवरमुळे न्युमोनिया, अतिसार, अन्य प्राणघातक धोके होऊ शकतात. तर गर्भावस्थेत रूबेलाचा संसर्ग झाल्यास नवजात शिशुमध्ये अंधत्व, बहिरेपणा, मतिमंदत्व, जन्मजात हृदरोग आदी आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ‘एमआर’ लस टोचून घ्यावी”, असे आवाहन देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.