Dehugaon : संत तुकाराम महाराज मंदिर निर्माणाच्या कार्याला सढळ हाताने आर्थिक सहकार्य करावे -हभप रामभाऊ राऊत महाराज

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आकाशाएवढ्या अलौकिक कार्याला साजेसे असे भव्य मंदिर निर्माणाचे काम सुरू आहे. हे मंदिर निश्चितच अद्वितीय असे होणार आहे. या कार्यासाठी सर्व भाविकांनी दानशूर दार त्यांनी सढळ हाताने सहकार्य करावे, अशी अपेक्षा हभप रामभाऊ राऊत महाराज यांनी व्यक्त केली.

माघ शुद्ध दशमी निमित्त जगद्गुरू तुकोबारायांना सद्गुरुची भेट प्राप्त झाली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी माघ शुद्ध दशमीला भंडारा डोंगर येथे अखंड गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात रामभाऊ राऊत महाराज बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार नानासाहेब नवले, माजी आमदार दिगंबर भेगडे, शंकरराव शेलार आदी उपस्थित होते.

आमदार शेळके यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सर्वांनी सढळ हाताने केलेल्या मदतीतून लवकरच भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभारले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भंडारा डोंगर येथील किर्तन महोत्सवांमध्ये वारकरी संप्रदायातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असणारे हभप रामभाऊ महाराज राऊत यांची कीर्तन सेवा झाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रसिद्ध सद्गुरु भेटीच्या अभंगावर रामभाऊ महाराज यांनी निरूपण केले.

तुकोबाराय या अभंगातून सप्रमाण सांगतात की, मी खूप साधने केली. नाना याद केले. पण सद्गुरू भेटत नव्हते. माघ शुद्ध दशमीला मला गुरु अनुग्रह झाला. गुरुप्राप्तीचा दिवस हाच खरा जन्माचा आणि मरणाचा दिवस होय. देव प्राप्तीनंतर शरीराचा संबंध तोडला. मी काय करतो याचे भानच नाही. म्हणजेच जिवंत असूनही मी शरीराचा कोणीच नाही. याचा अर्थ देव प्राप्ती हाच मृत्यू व जन्म. अशी तुकाराम महाराज यांची सद्गुरु भेटीनंतर अवस्था झाली असल्याचे राऊत महाराजांनी निरूपणात सांगितले.

मंगळवारी सायंकाळी हभप जंगले शास्त्री महाराजांचे संत तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्र कथेवर निरूपण झाले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हभप मारुती महाराज कु-हेकर बाबा यांनी सोहळ्यास भेट देऊन आशीर्वाद दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.