Dehugaon : तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज

Shri Sant Tukaram Maharaj Sansthan ready for Tukoba's palkhi departure

एमपीसीन्यूज : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी 335 व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. उद्या शुक्रवारी (ता.12 जुन) दुपारी 2 वाजता मोजक्याच लोकांमध्ये पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.

तत्पुर्वी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या प्रस्थान सोहळ्यापुर्वी श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या आतील भागाचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

यासाठी पिंपरी येथील क्रिएटिव्ह इंडस्ट्रियल हायटेक सव्हिसेस या संस्थेच्या मार्फत विजय बोत्रे यांनी ही सेवा बजावली. मंदिर व परिसराच्या निर्जंतुकीकरणासाठी 10 लीटर सोडीयम हायपो क्लोराईड व व्हिरेक्स या रसायनांचा वापर करण्यात आला.

शुक्रवारी मंदिर परिसरात वारकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी गर्दी करू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उद्या मंदिरामध्ये पोलिसांच्या परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनिष कल्याणकर यांनी सांगितले.

त्याच प्रमाणे प्रस्थान सोहळ्यासाठी गावात भाविक व वारकऱ्यांना सोडण्यात येणार नाही. यासाठी आज गुरूवारपासून गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शुक्रवारी पहाटे 4 वाजता संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व सर्व विश्वस्थांच्या उपस्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिरात काकड आरती, अभिषेक व महापूजा होईल.

पहाटे 4.30 वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा होईल. त्यानंतर पहाटे 5 वाजता वैंकुठगमण मंदिरातील महापूजा संस्थानच्या विश्वस्थांच्या हस्ते होणार आहे.

पहाटे 6 वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पुजा होईल. सकाळी नऊ वाजता सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेवून भजनी मंडपात आणतील.

सकाळी दहा वाजता श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्यापुर्वी आजोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने होणार आहे.

काल्याच्या किर्तनांनतर सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री विठ्ल रुख्मिणी यांची भेट घडवून किर्तन मंडपात आणतील. दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरवात होणार आहे.

या वर्षी कोवीड 19 चा प्रभाव असल्याने प्रथमच पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त यांच्यासह मोजक्याच लोकांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.

संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते विधिवत परंपरेप्रमाणे पालखीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली.

प्रस्थान झाल्यानंतर पादुका पालखीमध्ये ठेऊन परंपरे प्रमाणे मंदिराला प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी किर्तन मंडपात ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता समाज आरती होईल. सायंकाळी प्रथेप्रमाणे किर्तन व जागर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.