Dehugaon:  साधेपणाने लग्न करत गरजू नागरिकांना अन्नधान्य देत जोपासली सामाजिक बांधिलकी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थित साधेपणाने विवाह करत गरजू नागरिकांना अन्नधान्य देत देहूगावातील गाडे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे. महिनाभर पुरेल एवढे धान्य गरजूंना दिले आहे.  यानिमित्त गाडे आणि वीर परिवाराचे कौतुक होत आहे.

देहूगाव येथील दत्तात्रय गाडे यांची कन्या कोमल व  इंदोरी येथील  दत्तात्रय वीर यांचे चिरंजीव  संतोष यांचा रविवार 17 मे 2020 रोजी विवाह पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील सर्व नियम लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला.

कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी देशभरात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. हाताला काम नसल्याने पैशे मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

संकटकाळात गरीब, मजुर कुटुंबांवरील संकट लक्षात घेऊन गाडे परिवाराने विवाहानिमित्त गरजू कुटुंबांना त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन एक महिनाभर पुरेल असे किराणा साहित्य वाटप केले आहे. या समाजकार्याचे नियोजन नवरी मुलीचे चुलते, अभंग प्रतिष्ठानचे संचालक  सुरेश गाडे व अभंग प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

अशा कार्यामुळे एक आदर्श विवाह पद्धती समाजमनात रूजत आहे. या सेवाभावी कार्याबद्दल गाडे व वीर या दोन्ही कुटुंबांचे समाजात कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.