Dehugaon : श्री क्षेत्र भंडारा डोंगजवळच्या रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज- तळेगाव – चाकण महामार्गावरील तीर्थक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्यालगत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यावर बसलेल्या माशांमुळे रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे प्रवाशी आणि नागरिक त्रस्त असून,कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी सजग नागरिकांची मागणी आहे.

खेड,मंचर, जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव या भागातून मुंबईला मोठ्या प्रमाणावर तरकारी माल नेला जातो. मुंबईहून परत येताना वाहनचालक खराब आणि सडलेला माल प्लॅस्टिकच्या पिशव्यासह या भागात टाकतात. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी सडलेला भाजीपाला, प्लॅस्टिक पिशव्या, थर्मोकोलच्या डिश, कपडे, बॅगा, खराब बारदान टाकण्यात येत आहे.

वाहनचालक लघुशंकेसाठी या ठिकाणी थांबतात त्यामुळे श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याचे पावित्र्य राखले जात नाही. परिसरात चरावयास आलेली जनावरे टाकाऊ भाजीपाला खाण्यासाठी तुटून पडतात. खाद्यासह प्लॅस्टिक पिशव्या त्यांच्या पोटात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खाण्यावरून जनावरे एकमेकांना शिंगाने मारतात. त्यामुळे ही जनावरे रस्त्यावर येऊन महामार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक ट्रस्ट असून कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.