Dehugaon : इंद्रायणी नदी किनारी सापडलेला ‘तो’ मृतदेह श्वानचा

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीच्या किनारी अर्भक सापडले असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली होती. घटनेच्या ठिकाणी नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिका-यांनी भेट देऊन पंचनामा केला असता ते अर्भक नसून पामेरियन जातीच्या श्वान (कुत्र्या)चा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावाजवळ इंद्रायणी नदीच्या काठावर एक अर्भक सापडले असल्याची माहिती शनिवारी (दि. 30) रात्री देहूरोड पोलिसांना मिळाली. नदीच्या किनारी असलेल्या गाळात हा मृतदेह अडकला होता. त्यामुळे शनिवारी रात्री त्या ठिकाणी देहूरोड पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला.

रविवारी सकाळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ओळख पटविण्याचे काम सुरु झाले. हे अर्भकच आहे की अन्य काही याबाबत तपास सुरु झाला. जवळच नर्सिंग होम असल्याने अर्भक असण्याची दाट शक्यता होती. नायब तहसीलदारांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या समक्ष या प्रकरणाचा पंचनामा केला असता ते अर्भक नसून पामेरियन जातीच्या श्वानच्या मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.