Dehugaon : देहूतील उपोषणकर्त्यांनी घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे असलेल्या गायरान जमीन वाचविण्यासाठी ( Dehugaon) देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण आंदोलन केले. हे आंदोलन खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी खासदार बारणे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच गायरान जमीन वाचविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.

तीर्थक्षेत्र देहू येथील सर्वे नंबर 97 ही 189 एकर गायरान जमीन आहे. यातील 50 एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलिसांना देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरु आहेत. त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांचे मुख्यालय, परेड मैदान, शस्त्रागार निर्माण करायचे आहे. त्यामुळे पोलिसांकडून या जागेची मागणी केली जात आहे.

या ठिकाणी पोलिसांना 50 एकर जागा दिल्यास देहूगाव नगरपंचायतच्या नियोजित ( Dehugaon)  विकासकामांसाठी जागा अपुरी पडणार असल्याचे देहुकरांचे मत आहे. त्यामुळे देहूकरांनी पोलिसांना जागा देण्यास विरोध दर्शवला आहे. या जागेत देहूकरांना आवश्यक भाविकांसाठी पार्किंग, दिंड्यांची राहण्याची सोय, रुग्णालय, शाळा आणि अन्य सोयी सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.

Pune : आई हे संस्काराचे, तर वडील संघर्षाचे विद्यापीठ – उल्हास पवार

दरम्यानच्या काळात गायरानातील काही जागा पोलिसांना देण्याच्या हालचाली सुरु झाल्यानंतर देहूकरांनी बंद पाळला. निदर्शने केली. शासनाकडे पत्रव्यवहार केला तसेच उपोषण देखील केले. 28 ऑक्टोबर पासून देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले. तहसीलदार, प्रांत अधिकारी आदींनी हे उपोषण सोडण्यासाठी विनंती केली, मात्र त्यात प्रशासनाला यश आले नाही.

1 डिसेंबर रोजी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या वतीने लेखी आदेशाचे पत्र खासदार बारणे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

त्यानंतर रविवारी (दि. 3) हभप पुरुषोत्तम महाराज मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यालयात जाऊन बारणे यांची भेट घेतली. देहू येथील गायरान जमिनीचा देहूच्या विकासासाठी वापर व्हावा. याबाबत खासदार बारणे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खासदार बारणे यांनी उपस्थितांना सकारात्मक तोडगा काढण्याचे ( Dehugaon)  आश्वासन दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.