Dehugaon: ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास लाखों वैष्णवांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 371व्या वैकुंठगमण बीजोत्सव ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास राज्याच्याच नव्हे तर, देशाच्या कानाकोपऱ्यातील सुमारे तीन ते साडे तीन लाख वैष्णवांनी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता या सोहळ्यास उपस्थिती लावली. श्री क्षेत्र देहूगाव गोपाळपूरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या आवारात दुपारी बारा वाजता मनोभावे अभिवादन करीत नांदुरकीच्या झाडावर आबीर बुक्का आणि तुळशी पाने आणि फुलांची उधळण करीत आपले जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त करीत सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यासाठी काही दिवसांपुर्वीच तुकोबारायांची कर्मभूमी असलेल्या देहूनगरीत येऊन दाखल झालेल्या दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापुजा, हरिपाठ आणि वीणा- टाळ -मृदंग यांच्या साथीत भजन किर्तन आणि हरिनामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमन निघाला होता. यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी आज पहाटे चार वाजल्या पासूनच पांडूरंगाच्या तसेच श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात आणि गोपाळपूरा येथील वैकुंठगमण मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

  • सकाळी आठ वाजल्यापासून वैंकुठगमण मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी गोपाळपूऱ्याकडे वेगाने जात होते. जागा मिळेल तेथून हा सोहळा दृष्टीस पडेल, अशा ठिकाणी सुरक्षित जागेत बसून राहिले होते. सकाळी दहा वाजल्यानंतर मात्र, उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवू लागला होता. असे असतानाही भाविकांच्या मुखी हरिनाम आणि अंत:करणात भगवंताला अभिवादन करण्याची ओढ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तळपत्या उन्हाची आणि वाहणाऱ्या घामाच्या धारांची ते पर्वा न करता तुकोबारायांचे दर्शनासाठी मिळेल त्या वाहनाने तसेच सापडेल त्या रस्त्याने वेगाने देहूकडे येत होते.

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला पहाटे तीन वाजल्यापासून नियमित महापूजेने सुरवात झाली. देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब (पंढरीनाथ) मोरे व विश्वस्त जालिंदर मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. शिळा मंदिरात विश्वस्त सुनिल दिगंबर मोरे, अशोक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. वैकुंठगमण मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा विश्वस्त सुनिल दामोदर मोरे आणि अभिजित मोरे व विठ्ठल मोरे यांच्या हस्ते महापूजा पारंपारिक पध्दतीने करण्यात आली. संस्थानच्या वतीने मंदिराच्या गाभाऱ्यात आणि गोपाळपूरा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

  • या नैमित्तिक महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिरात, शिळामंदिर व वैकुंठगमण मंदिरात दर्शनाला सोडण्यात आले. सकाळी नऊ वाजता भजनी मंडपात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानच्या अशोक काळे यांच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांच्या हस्ते फडकरी व दिंडीचालकांना गाव तेथे गाथा या योजने अंतर्गत सार्थ गाथेचे वाटप करण्यात आले.

काळे हा उपक्रम गेली दहा वर्षांपासून राबवित आहेत. सकाळी मंदिरातील सर्व विधीवत पूजा उरकल्यानंतर सकाळी साडे दहाच्या सुमारास पालखीचे मानकरी तानाजी कळमकर, प्रकाश टिळेकर, दत्ता टिळेकर, कृष्णा पवार, गुंडाजी कांबळे, नामदेव भिंगारदिवे यांनी चोपदार नामदेव गिराम यांच्या सुचने नंतर पालखी पुंडलिका वरदा हारि विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकऱ्यांसह शिंगाडे, सनई चौघडा आणि ताशाच्या गजरात साडे दहा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरातून गोपाळपूऱ्याकडे रवाना झाली.

  • पालखी पुढे परंपरेप्रमाणे संबळ गोंधळी देविदास भांडे, चौघडा पिराजी पांडे, शिंगवाले पोपट तांबे, रियाझ मुलाणी यांनी ताशा, आब्दागिरी नवनाथ रणदिवे व घन:शान करपे, चौऱ्या भैयासाहेब कारके, भिकाजी साठे यांनी गरूडटक्के, तर जरीपटका महादेव वाघमारे यांनी यांनी आपल्या खांद्यावर घेतल्या होत्या. पालखी पुढे मानकरी कल्याणचे आप्पा महाराज लेले भैयांची दिडींचे चालक भाऊमहाराज लेले यांच्या दिंडीसह मोठ्या लवाजम्यासह पालखीचे मुख्य मंदिरातून वैकुठगमण मंदिराकडे प्रस्थान झाले.

पालखी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वैकुठगमण मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून येथील नांदुरकीच्या झाडाखाली आली. येथे महाराजांच्या वंशातील बापूमहाराज मोरे देहूकर यांचे सकाळी दहा ते बारा वाजे पर्यंत परंपरेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्याण प्रसंगावरील घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । या अभंगावर किर्तन झाले. या माध्यमातुन त्यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्याण प्रसंगाचे निरूपन करताना म्हणाले की लक्ष्मीच्या सहवासापेक्षा संत सहवास कसा महत्वाचा आहे हे सांगितले.

  • श्री संत तुकाराम महारांजानी हरिनाम संकिर्तनाच्या माध्यमातून व योग साधनेच्या सहाय्याने त्यांनी आपली काया ब्रम्हरूप कशी केली हे सांगितले. येथील किर्तन संपल्यावर दुपारी बारा वाजता बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल,असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. हरिनामाचा गजर झाल्या बरोबर उपस्थित भाविकांनी आपले दोन्ह हात जोडून डोळ्यासमोर महाराजांचे सदेह वैकुठगमण प्रंसगाचे चित्र उभे केले.

प्रयाणकाळी देवे विमान पाठविले। कलीच्या काळामाजी अद्‌भूत वर्तवले।। मानव देह घेऊनी निज धामा गेले। निळा म्हणे सकळ संता तोषविले।। या अभंगाचे गायन करीत उपस्थित लाखो भाविकांनी श्री संत तुकाराम महाराजांना मनोभावे अभिवादन केले. येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे रवाना झाली आणि त्याच वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. हा बीजोत्सोव सोहळा पार पडल्या नंतर येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

  • हा सोहळा दिडच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा घालुन संपन्न झाला. देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात प्रथे प्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य मंदिरात दर्शनबारी मंडपातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. या सोहळ्यास उपस्थित असलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे,आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, पार्थ पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अप्पर तहसिलदार गीता गायकवाड यांच्या हस्ते वैंकठगमन मंदिरातील संत तुकाराम महाराज मंदिरात आरती करण्यात आली.

याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे,मंडलाधिकारी शेखर शिदे, तलाठी अतुल गीते, पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, शाखा अभियंता बाळासाहेब मखरे, माजी सदस्य बाळासाहेब काळोखे,सुहास गोलांडे, सरपंच ज्योती टिळेकर, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, हेमा मोरे, सुनिता टिळेकर, उपसरपंच निलेश घनवट, सचिन साळुंके, सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब (पंढरीनाथ) महाराज मोरे व सर्व विश्वस्थ आदी उपस्थित होते.

  • दुपारी साडे बारा वाजल्यानंतर पालखी वैंकुठगमण मंदिरामधुन पुन्हा देऊळवाड्यात आल्यानंतर देऊळवाड्यात पालखी विसावली.सायंकाळी मुख्यमंदिरात 5 ते 7 शिरवळकर फडाचे तेथे किर्तन झाले, याच वेळी फरताळे दिंडी शिळामंदिरापुढे असते. संध्याकाळी 7 ते 9 वाजता राममंदिरापुढे देहूकरमहाराज फडाचे किर्तन, रात्री 7ते 9 याच वेळेत शिळामंदिरासमोर टेंभूकर फडाचे किर्तन झाले. रात्री 7 वाजता आळंदीकर चोपदारांचा मुख्यमंदिरात हरिपाठ झाला. त्यानंतर देहूकर फडाचा हरिपाठ झाला. रात्री नियमानुसार आरती झाल्यानंतर हैबतबाबा यांचा पहारा झाला. हेच कार्यक्रम तुकाराम बीज सोहळ्यापासुन म्हणजेच द्वितीये पासुन सप्तमी पर्यंत लळीत तुकाराम बीज सोहळ्याची सांगता होते तो पर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहे. सप्तमीला लळीताने कार्यक्रमाचा सांगता होणार आहे.

असा होता पोलीस बंदोबस्त
यात्रा काळात पोलीसांचा बंदोबस्त चोखबंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र अपेक्षित पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण आला. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होवू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.यामध्ये 6 पोलीस निरिक्षक,14 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 84 पोलीस कर्मचारी व 15 महिला पोलीस कर्मचारी, राज्य राखील दलाचे 50 जवान व शिग्रकृती दलाचे 25 जवान होते. मात्र यात्रेसाठी सुमारे 300 पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी होती परंतू शिवजयंती व लोकसभेची सार्वत्रिक निवडणूकीमुळे पुरेसे मनुष्यबळ मिळाले नसल्याची माहिती देहूरोडचे पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांनी सांगितले. अशा परिस्थितीत सुमारे तीन लाख भाविकांची यात्रा पार पाडणे म्हणजे मोठे दिव्य होते. पोलीसांच्या मदतीला काही स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, स्वकाम सेवा मंडळाचे असे जवळपास 200 स्त्री व पुरूष कार्यकर्ते मदतीसाठी आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.