Dehuroad : श्वान विकण्याच्या बहाण्याने तरुणाला 28 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – श्वान (कुत्रा) विकण्याच्या बहाण्याने तरुणाकडून 28 हजार रुपये घेतले. पैसे मिळूनही तरुणाला कुत्रा न देता त्याची फसवणूक केली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्राम विकास सोलंकुरे (रा. गवळी गल्ली पेठबाग, सांगली), नितीन गोपाळ निमजे (रा. नालासोपारा, ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल संभाजी शिंदे (वय 25, रा. विकासनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांना श्वान (कुत्रा) विकत घ्यायचा होता. आरोपी संग्राम याने विशाल यांना एक संपर्क क्रमांक दिला. तो व्यक्ती संग्रामचा भाऊ आहे. त्याच्याकडे श्वान (कुत्रा) असल्याचे संग्राम याने विशाल यांना सांगितले. त्यानुसार, विशाल यांनी नितीन याला संपर्क केला. नितीनने विशाल कडून त्यांचे लोकेशन घेतले. विशालने नितीनचे कागदपत्र मागवून घेतले. अशा प्रकारे विश्वास बसल्यानंतर विशाल यांनी नितीन सोबत व्यवहार करण्याचे ठरवले.

नितीनने श्वान (कुत्रा)चे फोटो पाठवले. सुरुवातीला त्याची किंमत 32 हजार सांगितली. तडजोड करून 28 हजार रुपयांचा श्वान (कुत्रा) देण्याचा व्यवहार ठरला. विशाल यांनी नितीनला गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे पाठवले. पैसे मिळून देखील नितीनने विशाल यांना श्वान न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.