Dehuroad : शहरातील 55 नागरिक क्वारंटाइन; कॅन्टोन्मेंटची हेल्पलाईन सुरु

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील शिवाजीनगर भागात दोन लहान मुली कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य पथकाने परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार ‘हाय रिस्क’ आणि ‘लो रिस्क’मधील एकूण 55  नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील 21  जणांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात तर अन्य पंडित नेहरू मंगल कार्यालयात व काहींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आजपासून ( शुक्रवार) कोविड 19  बाबत हेल्पलाईन सुरु करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट प्रशासनाने दिली.

बुधवारी ( दि. 30 ) देहूरोड येथील शिवाजीनगर येथे दोन लहान मुली कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य पथकाने परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार एकूण 55 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील 21  जणांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात तर अन्य पंडित नेहरू मंगल कार्यालयात व काहींना होम क्वारंटाइन करण्यात आले. सध्या एम बी कॅम्प येथील महात्मा गांधी शाळेत क्वारंटाइन सेंटर तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासकीय निर्देशानुसार आगामी काळात आरोग्य पथकामार्फत घरोघरी सर्वेक्षण करणे, गरजेनुसार काही भाग सील करणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी दिली.

तर शिवाजीनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शेजारील वॉर्ड क्रमांक तीनची हद्दही सील करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासन, देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती वॉर्ड क्रमांक तीनचे नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाबाधित झालेल्या दोन्ही मुलींची प्रकृती सध्या स्थिर असून, त्या दोघीही लवकरच कोरोनामुक्त होतील, असा विश्वास कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी व्यक्त केला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड सज्ज आहे. नागरिकांना घरपोहोच भाजीपाला आणि किराणा साहित्य देण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही हरितवाल यांनी केले आहे.

 नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रत्येकाने लॉकडाऊनचे पालन करावे. नागरिकांसाठी 24 बाय 7  दिवस कोविड 19  हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांनी 9370950835 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.  रामस्वरूप हरितवाल – मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.