Dehuroad : वादळात झाड कोसळून गायीचा जागीच मृत्यू ; परिसरात शेतीसह अनेक घरांचे नुकसान

A cow dies on the spot when a tree falls in a storm; Damage to several houses including agriculture in the area

एमपीसीन्यूज : बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात देहूरोड येथे शेतातून घराकडे येत असलेल्या देशी गाईवर झाड कोसळले. यात गाईचा जागीच मृत्यू झाला.  सुदैवाने गायीसोबत असलेला शेतकरी काही अंतरावर असल्याने तो थोडक्यात बचावला. दरम्यान, या वादळात देहूरोड परिसरात शेतीसह अनेक जुन्या घरांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी दुपारी अलिबागच्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकले. या वादळाचा मोठा प्रभाव पुणे जिल्ह्यात विशेषतः मावळ तालुक्यात जाणवला. या वादळाने मावळच्या ग्रामीण भागात दाणादाण उडवून दिली. तर मावळचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहूरोड शहरातही या वादळाने मोठे नुकसान केले.

दुपारनंतर वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरु झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे देहूरोड येथील शंकर मंदिर येथे राहणारे शेतकरी श्रीरंग अमृता दांगट आणि त्यांचा मुलगा मयूर दांगट हे दोघेजण शेतात चारण्यासाठी सोडलेले बैल आणि देशी गाय आणण्यासाठी शेतात गेले.

शेतातून जनावरे घेऊन येताना दूरध्वनी केंद्रामागे वादळी वाऱ्याने एक मोठे झाड कोसळले. प्रसंगावधान राखत मयूर हे मागे सरकले. मात्र, ते झाड त्यांच्या गायीवर कोसळले. झाड मोठे असल्याने गाय जागीच ठार झाली.

या दुर्घटनेत सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे दांगट यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दांगट यांचा एक बैल शेतातून चोरी झाला होता. त्यानंतर आता वादळी वाऱ्याने त्यांची दुभती गाय हिरावून नेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सरकाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्रीरंग दांगट यांनी केली आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत इको कारवर झाड कोसळल्याने कारचे मोठे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. देहूगाव, देहूरोड व परिवारात अनेक ठिकाणी या वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसात अनेक वृक्ष उन्मळून पडले.

तर देहूगावमध्ये अनेक ठिकाणी घराच्या छतावरील पत्रे उडून गेले. यात ९ झोपड्यांचे नुकसान झाले आहे. कच्च्या घरांची देखील पडझड झाली आहे.

या संदर्भात अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी शेती, पक्की व कच्ची घरे,  झोपड्या, प्राणी यांची जीवितहानी होऊन झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.