Dehuroad : उधार दारू मागत दारूच्या दुकानातील कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज – जबरदस्तीने उधार दारू मागत चार जणांनी मिळून दारूच्या दुकानात राडा घातला. दुकानातील कामगाराला मारहाण करून एक हजार 115 रुपयांच्या दारूच्या बाटल्या जबरदस्तीने नेल्या. ही घटना 13 मार्च रोजी रात्री देहूरोड बाजारात घडली असून, याबाबत 19 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम दत्तात्रय पासलकर (वय 39, रा. विकासनगर, किवळे, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश पिल्ले, शेऱ्या अढागळे व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पासलकर यांचे देहूरोड बाजारात मोटवाणी वाईन्स नावाचे दुकान आहे. 13 मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास फिर्यादी दुकानात असताना तेथे आलेल्या आरोपी आकाश याने उधार दारू देण्याची मागणी केली. मात्र, दुकानातील कामगार जगदीश पोरोल यांनी उधार देण्यास विरोध केला.

त्यामुळे आरोपींनी कामगाराला धमकी दिली. ‘तुला बघून घेईल. पोलिसांना सांगायचे तर सांग. मी आत्ताच जेल मधून बाहेर आलोय. मी पैसे देणार नाही. रोज उधार दारू घेऊन जाणार’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानातील कामगारांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर एक हजार 115 रुपयांच्या दारूच्या बाटल्या घेऊन गेले.

या घटनेनंतर फिर्यादी घाबरल्याने त्यांनी 19 मार्च रोजी फिर्याद दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like