Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत उद्यापासून पाच दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धर्तीवर आता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत उद्यापासून दि. 21 ते दि. 25 एप्रिल या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी पत्राद्वारे  दिली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दि. 20 ते 27  एप्रिल या कालावधीत कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. दरम्यान,  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.

मात्र, तरीही या साथरोगाचा कॅन्टोन्मेंट हद्दीत शिरकाव होऊ नये, म्हणून उद्यापासून दि. 21  ते दि. 25  एप्रिल या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त किराणा, मेडिकल, दूध विक्री आणि रुग्णालये सुरु राहतील. अन्य सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी म्हटले आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीलगतच्या निगडी-रुपीनगर भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीला लागूनच महापालिकेची हद्द आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिक मोठ्यासंख्येने कॅन्टोन्मेंट हद्दीत भाजीपाला खरेदीसाठी येत असतात. सध्या नागरिकांच्या सोयीसाठी एम. बी. कॅम्प येथे मोकळ्या जागेत  भाजी मंडई भरविण्यात येत आहे. मात्र, येथे नागरिक दररोज गर्दी करतात. त्यात महापालिका हद्दीतील नागरिकांची संभाव्य गर्दी टाळण्यासाठी दि. २० ते २७ एप्रिल या कालावधीत भाजीमंडई सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे.  रघुवीर शेलार : उपाध्यक्ष- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.