Dehuroad : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणा-यास अटक; धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलीस कर्मचा-यास पोलीस आयुक्तांकडून पाच हजारांचे बक्षीस

एमपीसी न्यूज – गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानात लूटमार करत असलेल्या आरोपीला देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक शिरसाठ यांनी हत्यारासह ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शिरसाठ यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दीपक पप्पू पांडे (वय 18, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 24) रात्री दहाच्या सुमारास देहूरोड बाजारातील मोटवाणी वाईन्स शॉपचे व्यवस्थापक राजू देवमनी यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून आरोपी दीपक लुटण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी देहूरोड बाजार परिसरात गस्त घालत असलेल्या पोलीस शिपाई शिरसाठ यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपीसोबत झटपट करून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील गावठी कट्टा देखील जप्त केला.

आरोपी दीपक पांडे याच्यावर लूटमार व मारामारीचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याचे वय कमी असल्याचा फायदा घेऊन तो गुन्हे करीत होता. पोलीस शिपाई शिरसाठ यांच्या कामगिरीची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना मिळताच त्यांनी शिरसाठ यांना पाच हजार रुपये रोख व प्रशंसापत्र असे बक्षीस जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.