Dehuroad : सामोशात सुतळी आढळल्याप्रकरणी’अशोका हॉटेल’ला 50 हजारांचा दंड

अन्न व औषध प्रशासन विभागाचा दणका : Ashoka Hotel fined Rs 50,000 for twine in Samosha

एमपीसीन्यूज : सामोशात सुतळी आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या न्याय निर्णय अधिकाऱ्यांनी देहूरोड बाजारपेठेतील अशोका स्वीट अँड रेस्टॉरंटला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांकडे तक्रार केली होती.

गेल्या वर्षी 11 ऑगस्ट 2019 रोजी सावंत यांच्या पुतण्याने देहूरोड बाजारपेठेतील अशोका स्वीट अँड रेस्टॉरंटमधून 20  सामोसे आणले होते. यातील एक सामोसा लहान मुलगा खात असताना त्याला सामोशात सुतळी आढळून आली.

हा प्रकार सावंत यांनी तातडीने संबंधित हॉटेल मालकाला सांगितला तसेच सामोसा आणि त्यात आढळून आलेली सुतळीही दाखवली. मात्र, त्याने याकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे सावंत यांनी थेट अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची तातडीने दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न व औषध निरीक्षकांनी अशोका स्वीट अँड रेस्टॉरंटची तपासणी केली. तसेच हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या न्याय निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले.

त्यावर न्याय निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल मालकाला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईचे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती स्वतः संजय सावंत यांनी दिली आहे.

सामोशात सुतळी आढळल्यानंतर अशोका स्वीट अँड रेस्टॉरंट विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर माझ्यावर प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा सर्व प्रकार ग्राहकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने मी तक्रारींवर ठाम राहिलो. अखेर या प्रकरणात संबंधित हॉटेलला दंड ठोठावण्यात आला. शहरातील अन्य हॉटेल व्यवसायिकांनी याचा बोध घ्यावा. या पुढे असे प्रकार आढळून आल्यास पुन्हा तक्रार केली जाईल. संजय सावंत : माहिती अधिकार कार्यकर्ता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.