Dehuroad : शेकोटीत गांजा टाकल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार

एमपीसी न्यूज – गवताची शेकोटी करून एक तरुण शेकत बसलेला असताना एकाने तिथे येऊन शेकोटीत गांजा टाकला. शेकोटीत गांजा टाकल्याचा तरुणाने जाब विचारला. त्यावरून एकाने तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना देहूगाव माळवाडी येथे शुक्रवारी (दि. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

जखमी मुलाचे वडील दत्तात्रय गोपीनाथ टिळेकर (वय 50, रा. देहूगाव, माळवाडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शंकर बालदत्तात्रय सराफ (रा. देहूगाव, माळवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा आशिष टिळेकर गवताची शेकोटी करून शेकत बसला होता. आरोपी तिथे आला आणि त्याने शेकोटीत गांजा टाकला. यावरून आशिष याने ‘शेकोटीत गांजा का टाकला, आता लोक मला व्यसनी समजतील’, अशी विचारणा केली. यावरून आरोपीने रागात जाऊन धारदार शस्त्राने आशिष याच्यावर वार केले. तसेच मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक येडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.