Dehuroad : भांडण करू नका म्हटल्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा, एकाला अटक

एमपीसी न्यूज – वस्तीच्या बाहेरची मुले आणून भांडण करणाऱ्या तरुणाला एकाने भांडण करण्यापासून रोखले. या कारणावरून सहा जणांनी मिळून भांडण करण्यास रोखणा-या तरुणाला, त्याचा भाऊ, काका आणि मित्रांना दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेतीनच्या सुमारास देहूरोड येथील एम. बी. कॅम्प येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. यामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

निखिल आगळे (वय 20) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह प्रशांत आगळे, अक्षय आगळे, शुभम आगळे, अनमोल काकडे, सोन्या पानसरे (सर्व रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रवीण भागवत ठोकळे (वय 32) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी प्रवीण यांचा भाऊ अश्विन हा पाण्याच्या टाकीजवळ गेला होता. त्यावेळी आरोपी निखिल याच्या ओळखीचे वस्तीच्या बाहेरील मित्र तेथे आले होते. ते आपसात भांडण करून मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. त्यामुळे अश्विन यांनी निखिल याला ‘बाहेरची मुले घेऊन येऊन भांडण कशाला करतो’ असे म्हटले.

त्यावरून आरोपींनी अश्विन यांना शिवीगाळ करत मारहाण केली. अश्विन यांना मारहाण केल्याची माहिती फिर्यादी यांच्या पत्नीने फिर्यादी यांना सांगितली. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे काका आणि मित्र घटनास्थळी गेले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. निखिल याने प्रवीण यांच्या डोक्यात दगड मारला.

यात प्रवीण जखमी झाले. त्यानंतर आरोपीच्या मित्रांनी देखील दगड फेकून मारले. त्यात फिर्यादी यांचे काका आणि मित्र जखमी झाले. पोलिसांनी निखिल याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.