Dehuroad : पोलीस ठाण्याच्या आवारातून पळवली महागडी दुचाकी

चिखली, दिघी परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्याच्या आवारातून देखील वाहने चोरीला जात आहेत. तर शहरातील वाहनांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न पडावा असा प्रकार उघडकीस आला आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केलेली 1 लाख 35 हजार रुपयांची महागडी दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तसेच चिखली आणि दिघी परिसरातून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सोमवारी (दि. 20) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन गुरुदास पवार यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2019 ते 9 जानेवारी 2020 या कालावधीत देहूरोड-तळेगाव वाहतूक विभागाच्या कार्यालयाच्या मागील बाजूला एम एच 14 / एच बी 1000 ही 1 लाख 35 हजार रुपये किमतीची केटीएम दुचाकी लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात कुणाल सतीश जाधव (वय 35, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांनी त्यांची एम एच 14 / एच एन 4677 ही 20 हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोरील रस्त्यावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री अकरा ते शनिवारी (दि. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या प्रकरणात किसन नागोराव पवार (वय 34, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी डब्ल्यू 5930 शुक्रवारी रात्री घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.