Dehuroad : वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजप, काँग्रेस नगरसेवकांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची भेट

BJP, Congress corporators met MSEDCL officials to streamline power supply

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने देहूरोड परिसरात महावितरणचे विजेचे खांब आणि वीज वाहक तारांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार आणि काँग्रेसचे नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार आणि पुणे जिल्हा उपाध्यक्ष लहू शेलार उपस्थित होते. वादळाच्या तडाख्याने देहूरोड शहरात व परिसरात बुधवारी आणि गुरुवारी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. वीज वाहक तारांवर झाडे पडली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विजेअभावी शहरातील पाणीपुरवठाही विस्कळीत झाल्याने नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आल्याचे शेलार आणि मारीमुत्तू यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता चौधरी आणि देहूरोडचे शाखा अभियंता तळपे यांच्या निर्दशनास आणून दिले. तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदनही दिले.

यावेळी शेलारवाडी गावातील वीज पुरवठा तळेगावऐवजी चिंचवड फिडरकडून देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. या बाबत लवकरच पाहणी करण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिल्याचे शेलार यांनी सांगितले.

दरम्यान, महावितरणच्या सर्व कामगारांनी युद्धपातळीवर दिवसभर सकाळपासून रात्री अकरावाजेपर्यंत काम करून देहूरोड शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम केले. त्यामुळे सध्या देहूरोड आणि परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणचे उपविभागीय अभियंता चौधरी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.