Dehuroad : दरवाजा तोडून फ्लॅटमधून सोन्याचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – फ्लॅटचा लोखंडी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 13) पहाटे बरलोटा नगर, मामुर्डी, देहूरोड येथे उघडकीस आली.

गिरीप्रसाद व्ही.  रवींद्रन (वय 39, रा. मारुंजी, हिंजवडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील मामुर्डी येथील बरलोटा नगर मध्ये राहतात. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास फिर्यादी यांच्या वडिलांच्या अपार्टमेंटमध्ये शेजारी राहणारे जोसेफ यांनी फिर्यादी यांना फोन केला. जोसेफ यांनी सांगितले की, तुमचे वडील राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा तुटलेला आहे. तुम्ही इकडे येऊन पाहून जा.

त्यानुसार फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे लोखंडी गेट तोडून मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त टाकून चोरट्यांनी कपाटातून 40 हजार रुपयांचे जुने सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे उघडकीस आले आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.