Dehuroad Crime News : देहूरोड, चाकण, पिंपरीत चार घरफोड्या

एमपीसी न्यूज – देहूरोड, चाकण आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी गुन्हेही दाखल केले आहेत. चार घटनांमध्ये चोरटयांनी एक लाख 91 हजार 241 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

काशीनाथ विनायक चौधरी (वय 30, रा. देहूगाव, पुणे. मूळ रा. जळगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (दि. 26) सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व लॉक तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधून एक लाख तीन हजार 741 रुपयांचे तीन तोळे 161 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

सागर अर्जुन झोपे (वय 35, रा. स्पाईन रोड, चिंचवड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इलियास मेहमूद शेख (रा. लांडेवाडी, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी (दि. 26) रात्री दहा वाजताच्या सुमारास निघोजे येथील अॅडविक हायटेक प्रा ली या कंपनीतून आरोपींनी वेगवेगळ्या मशिनरीचे कॉपरचे रॉड, कॉपरचे पाईप, कॉपर केबल असा एकूण 20 हजारांचा ऐवज चोरून नेला.

चाकण पोलीस ठाण्यात आणखी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्याप्रकरणी बाळासाहेब नारायण पोखरकर (वय 48, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 27) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 12 ग्रॅम वजनाचे सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 58 हजारांचा ऐवज चोरून नेला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

उद्यमनगर, पिंपरी येथील दिव्यम आय केअर नावाच्या दवाखान्यातून अज्ञात चोरट्यांनी डोळे तपासणी यंत्र आणि त्या यंत्राचा चार्जर असा एकूण साडेनऊ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी एका महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.