Dehuroad : एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने अज्ञात तरुणाने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून 20 हजार रुपये पळवले. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेदहाच्या सुमारास देहूरोड पेट्रोल पंपाजवळ एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.

सुदाम एकनाथ काळे (वय 77, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी तरूण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदाम देहूरोड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी तरूणाने सुदाम यांना एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याचा बहाणा केला.

सुदाम यांचा विश्वास संपादन करून त्यांचे एटीएम कार्ड घेऊन सुदाम यांच्या खात्यातून वीस हजार रुपये काढले. काढलेले पैसे सुदाम यांना न देता त्याचा अपहार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.