Dehuroad crime News : किवळे -विकासनगर येथे भर दिवसा घरफोडी; 18 तोळ्यांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – किवळे -विकासनगर येथे चोरट्यांनी भर दिवसा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करीत सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने आणि 30 हजारांची रोकड चोरून नेली आहे. हा प्रकार आज (गुरुवारी, दि. 24) दुपारी चार वाजता उघडकीस आला.

रमेशकुमार कन्हैया सिंग (रा. श्री साई अपार्टमेंट, पेंडसे कॉलनी, किवळे, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग हे खासगी नोकरी करतात. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ते नोकरीवर गेले. त्यावेळी त्यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. त्यानंतर भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातून चोरट्यांनी सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने आणि 30 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. दुपारी चार वाजता सिंग नोकरीवरून घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.