Dehuroad: शहर पुन्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये राहून आलेल्या देहूरोडच्या दोन मुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शहरात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देहूरोडला भेट देऊन उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांची समक्ष पाहणी केली. देहूरोड पुन्हा कोरोनामुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

 देहूरोडमध्ये उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका,औषधे, रुग्णालयांमधील बेड, डॉक्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता, विलगीकरण कक्ष आदी वैद्यकीय सुविधांची समक्ष पाहणी केली. त्यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी त्यांना माहिती दिली.त्यावेळी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर आदी उपस्थित होते.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने एम. बी. कॅम्प शाळेत 100 बेडचा विलगीकरण कक्ष तयार केला आहे.  तसेच देहूरोड शहराचे दहा विभाग तयार करून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दोन अधिकारी, एक पोलीस कर्मचारी व इतर टीम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन पद्धतीने देखरेख करणार आहे. तसेच देहूरोडकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क असून आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार शेळके यांनी केले आहे.

देहूरोडमधील दोन लहान मुलींना कोरोनाची लागण झाली असून त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी सदिच्छा आमदार शेळके यांनी व्यक्त केली. यापुढे देहूरोडमध्ये नवीन कोरोना रुग्ण सापडणार नाही, यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार शेळके यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.