Dehuroad Corona News : देहूरोडमधील कोविड मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टची नियुक्ती

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची परिपत्रकाद्वारे माहिती

एमपीसीन्यूज : देहूरोड शहरातील कोरोना बाधित रुग्ण दगावल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी आता निगडी किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. देहूरोड शहरातील सर्व धर्मीय कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टला परवानगी देण्यात आली आहे. या ट्रस्टने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व अन्य धर्मियांच्या कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयात बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी आज, मंगळवारी ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टला याबाबत परवानगीचे लेखी पत्र दिले. बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश नायर, उपाध्यक्ष सगाई नायर, माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन आदी उपस्थित होते.

यापूर्वी देहूरोडमधील कोविड मृतदेहांवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी आणि इतर स्मशानभूमींवर अवलंबून रहावे लागत होते. कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, शिवसेनेचे शहरप्रमुख भरत नायडू यांनी देहूरोडमधील कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी कॅंटोन्मेंट प्रशासनाकडे केली होती. तसेच या बाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्याचबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी पुण्यातील ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टसोबत संपर्क साधून यशस्वी पाठपुरावा केला.

त्यानुसार देहूरोड शहरातील सर्व धर्मीय कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टला परवानगी देण्यात आली आहे. या ट्रस्टने अंत्यसंस्कार करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. ही टीम देहूरोडमधील हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम आणि इतर धर्मांच्या कोविड मृतदेहांचे त्यांच्या धार्मिक विधी व कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करणार आहे.

या टीममध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन, के. पी. अ‍ॅडम, मंगेश कुमार पोडाळा, सायमन शट्टी, सुनील सांगली, चंद्रशेखर रजोली, राजेश सपारे, अमोल असंगीकर, आनंदराज पोल्या, जॉनसन रॉबर्ट आदींचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.