Dehuroad : पारशी चाळीतील तरुण कोरोना पॉझिटिव्ह; कॅन्टोन्मेंट हद्दीत सध्या 2 कोरोना रुग्ण

Corona positive found in Parshi chawl youth; Currently 2 corona patients in the cantonment aria

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत वॉर्ड क्रमांक चारमधील पारशी चाळ येथे एक 44 वर्षीय तरुणाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सहा व्यक्तींना महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले, तर त्यांच्या आजूबाजूच्या एकूण 30  नागरिकांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी ही माहिती दिली.

पारशी चाळ येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुण सोलापूर येथे गेला होता. तेथून चार दिवसांपूर्वी परत आल्यानंतर त्याने वैद्यकीय तपासणी केली असता गुरुवारी रात्री 11 वाजता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

त्याच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्याच्या कुटुंबातील सहा व्यक्तींना महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या आजूबाजूच्या एकूण 30  नागरिकांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले.

सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने पारशी चाळ परिसर सील करण्यात करण्यात आला आहे. या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. पारशी चाळ परिसर 14 दिवसांसाठी मायक्रो कॅटेन्मेन्ट झोन जाहीर करण्यात आला आहे.

याआधी कॅन्टोन्मेंट हद्दीतील चिंचोली या गावात एका 60  वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णावरही यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तसेच वॉर्ड क्रमांक चारमधील शिवाजीनगर येथेही दोन लहान मुलींना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या दोन्ही मुलींनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, कॅन्टोन्मेंट हद्दीत वॉर्ड क्रमांक चारचा बहुतांश परिसर झोपडपट्टी बहुल आहे. या वॉर्डातील शिवाजीनगर आणि पारशी चाळ या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे झोपड्पट्टी भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

देहूरोड परिसरात सध्या कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. नागरिकांनी स्वतःसह इतरांची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.