Dehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण संख्येत घट; कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत शिवाजीनगर, राजीव गांधीनगर, शीतलानगर नं. 2 या परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच शिवाजी विद्यालय व दत्तमंदिर (शिवाजीनगर ) या ठिकाणी रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. आज, इंद्रप्रस्थ बिल्डिंग येथे एका पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनातून बरे झालेल्या 4 रुग्णांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, हद्दीतील दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1170 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’  या मोहिमेत शिवाजीनगर, राजीव गांधीनगर, उदयगिरी, मेहता पार्क, के एम पार्क, शीतलानगर नं. 2, कुणाल हॉटेल व सर्व बिल्डिंग परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच शिवाजी विद्यालय व दत्तमंदिर (शिवाजीनगर ) या ठिकाणी रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली.

या मध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र, हे दोन्ही रुग्ण हद्दीबाहेरचे होते. तर नियमित तपासणीत इंद्रप्रस्थ बिल्डिंग येथे एक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला.

आज 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 1052 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 86 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 8 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 34 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयसोलेशनमध्ये 44 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील शिवाजीनगर येथील ५६ वर्षीय पुरुष आणि गांधी नगर येथील ५९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे दोघे अनुक्रमे २६ आणि २९ सप्टेंबरमध्ये मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 32 इतकी झाली आहे.

उद्या ‘या’ भागात होणार घरोघरी तपासणी

दरम्यान, उद्या, गुरुवारी पारशी चाळ, मेन बाजार, पोर्टर चाळ, पोलीस कॉलनी, एलआयजी क्वार्टर, इंद्रायणी दर्शन येथे घरोघरी आरोग्य तपासणी होणार आहे. तसेच वैश्य मंदिर व हनुमान मंदिर (अबूशेठ रोड ) या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार आहे. या भागातील सर्व नागरिकांनी घरी राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.