Dehuroad Crime: भरदिवसा दुकानांची तोडफोड करत टोळक्याचा सशस्त्र राडा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हत्यारे घेऊन आलेल्या चार जणांच्या टोळक्याने मामुर्डी मधील थॉमस कॉलनीतील दोन दुकानांची तोडफोड केली. एका दुकानाच्या गल्ल्यातून जबरदस्तीने रोकड काढून घेतली. दुकानदाराला मारहाण करत इथे व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली.

हा प्रकार मंगळवारी (दि. 27) दुपारी साडेचार वाजता घडला. देहूरोड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  इमरान नजीर शेख (वय 26), हुसेन हमीद सय्यद (वय 21), सनी मनोज रॉय (वय 23, सर्व रा. मामुर्डी, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कल्लू रॉय (रा. मामुर्डी, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेस्मीन मीनारारूल शेख (वय 28, रा. थॉमस कॉलनी, मामुर्डी, देहूरोड) यांनी मंगळवारी (दि. 27) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेचार वाजता आरोपी हत्यारे घेऊन फिर्यादी शेख यांच्या दुकानासमोर आले. परिसरात दहशत माजवून फिर्यादी शेख आणि त्यांच्या पतीला कोयता, रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. शेख यांच्या दुकानाची काच फोडून गल्ल्यातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

त्यानंतर आरोपींनी शेख यांच्या दुकानाच्या समोर उभा केलेल्या टेम्पोची काच फोडली. ‘इधर धंदा करनेका है तो हमको हप्ता देना पडेगा. नही तो जानसे मार दुंगा’ अशी धमकी देऊन शेख यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या बेकरीच्या दुकानावर दगडफेक करून शिवीगाळ केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.