Dehuroad Crime : प्रवाशासोबत वाद घालून मोबाईल व रोकड पळवणा-या रिक्षा चालकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – भाडे वाढवून देण्यासाठी प्रवाशासोबत वाद घालून जबरदस्तीने मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री साडेसात वाजता सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली. याबाबत पोलिसांनी रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

अरबाज बशीर शेख (वय 23, रा. गहुंजे गावठाण, ता. मावळ), संतोष उर्फ सोन्या चंद्रकांत धरणे (वय 31, रा. मामुर्डी, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नारायण प्रभाकर गोकरे (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत शनिवारी (दि. 28) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोकरे आरोपीच्या रिक्षातून देहूरोड येथे आले. सेंट्रल चौकात आल्यानंतर रिक्षा चालक आरोपी अरबाज याने नारायण यांच्यासोबत भाडे वाढवून देण्यासाठी वाद घातला. त्यानंतर ‘मला माझ्या कॉन्ट्रॅक्टर सोबत बोलायचे आहे. मला तुमचा फोन द्या’ असे म्हणाला. रिक्षा चालक अरबाज आणि आणि त्याचा साथीदार संतोष याने मिळून गोकरे यांचा 12 हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि 200 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली.

देहूरोड पोलिसांनी तपास करत रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. आरोपींकडून मोबाईल फोन आणि रिक्षा जप्त केली आहे.

सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसाद गज्जेवार, कर्मचारी शाम शिंदे, दादा जगताप, प्रशांत पवार, कुरणे, सुमित मोरे, सचिन शेजाळ, दिपक शिरसाठ, संकेत घारे, विजय गेंगजे यांनी ही कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.