Dehuroad Crime News : पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक आणि दोन पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – पतीने मारहाण केल्याबाबत तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात आली असता महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात येऊन महिलेला शिवीगाळ केली. तसेच तिला मारण्यासाठी धावून गेला. त्याला रोखण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलिसांना देखील महिलेच्या भावाने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.

याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्यात घडली.

कुलदीप अरुण वाघचौरे (वय 36, रा. निगडी प्राधिकरण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांनी बुधवारी (दि. 22) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंगळवारी रात्री देहूरोड पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत होते. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास एक महिला पोलीस ठाण्यात आली. तिला पतीने मारहाण केल्याने ती जखमी होती. पोलीस तिला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवत होते. त्यावेळी महिलेचा भाऊ आरोपी कुलदीप पोलीस ठाण्यात आला. त्याने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

तिला मारण्यासाठी अंगावर धावून जात असताना फिर्यादी पोलीस हवालदार भोसले मध्ये पडले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गेज्जेवार, पोलीस शिपाई गोरखे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. फिर्यादी यांची गचांडी पकडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.