Dehuroad Crime News : उबेर चालकाला मारहाण करून कार पळवणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – उबेर कार चालकाला बेदम मारहाण करून तीन जणांनी मिळून कार पळवून नेली. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री साडेअकरा वाजता किवळे ब्रिजजवळ, देहूरोड येथे घडली. वाकड पोलिसांनी कार पळवणा-या तिघांना अटक केली आहे.

आकाश उर्फ अक्षय रामदास खरात (वय 18), सुनील अर्जुन पवार (वय 26), राहुल हिरामण लष्करे (वय 19, तिघे रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

महारुद्र चोबे (वय 26, रा. काटेपूरम चौक, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी चोबे उबेर कार सर्विसच्या माध्यमातून कार चालवतात. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांना उबेरचे किवळे ब्रिजजवळ ऑनलाईन लोकेशन आले. तिथून प्रवासी ग्राहकाला घेण्यासाठी चोबे त्यांची कार (एमएच 14 / एजी 5831) घेऊन गेले.

तिथे त्यांना तीन इसमांनी हात करून थांबवले. चोबे यांना कार मधून जबरदस्तीने खाली ओढले. कारची चावी घेतली आणि चोबे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चोबे यांची 5 लाख 11 हजार 500 रुपयांची कार घेऊन आरोपी पळून गेले.

त्यानंतर चोबे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. नियंत्रण कक्षातून ही माहिती ब्रॉडकास्ट करण्यात आला. भूमकर चौकातून चिंचवडकडे येणा-या एका संशयित कारचा वाकड पोलिसांनी पाठलाग केला. ती कार काळाखडक झोपडपट्टी येथे लाऊन त्यातून तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

पोलिसांनी सुरुवातीला कार ताब्यात घेतली. त्यानंतर तिन्ही आरोपींचा शोध सुरु केला. वाकड पोलिसांनी तिन्ही आरोपींना काळाखडक झोपडपट्टीतून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कार चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, उपनिरीक्षक प्रणील चौगले, तात्यासाहेब शिंदे, प्रशांत गिलबिले, कल्पेश पाटील, बारकुले, बाबाजान इनामदार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.