Dehuroad Crime News : घरातील अडचणी दूर करण्यासाठी सात्विक पूजेचा बहाणा; केली साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पत्नीचा आजार मुलाचे लग्न व घरातील अडचणी दूर होतील, असे सांगत सहा जणांनी मिळून एका व्यक्तीची तब्बल साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2018 ते 30 एप्रिल 2019 या कालावधीत रावेत येथे घडला आहे.

विनेश भिकू पाटणे (वय 50, रा. रोहा, रायगड), शुभांगी सुरेंद्र मगरे (वय 40, रा. नाहूर), सुनील महादेव घारे (वय 60, रा. लोणावळा), सुरेंद्र मगरे (रा. नाहूर), राजश्री चाफे (वय 45, रा. कल्याण), विनोद पांड्या (वय 55, रा. मुलूड), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अर्जुन हनुमंत कालेकर (वय 64, रा. सिल्व्हर पाम ग्रोव्ह सोसायटी, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 15) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पत्नीला लवकर बरे करू, असे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. त्यासाठी 98 हजार रुपये धनादेशाद्वारे तसेच दोन लाख दोन हजार रुपयांची रोख रक्कम वेगवेगळ्या तारखेला घेतली. तुमच्या पत्नीचा आजार व मुलाचे लग्न व इतर घरातील अडचणी दूर होतील. त्यासाठी रत्ने व पैडल करून त्याची सात्विक पद्धतीने पूजा करून देतो, असे सांगून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

पैडल व रत्ने यासाठी साडेतीन लाख रुपये रोख घेतले. मात्र त्याचा कोणताही परिणाम न जाणवल्याने फिर्यादी यांनी पैसे परत मागण्यासाठी आरोपी यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. आरोपी यांनी फिर्यादीचा फोन घेण्यास टाळाटाळ करून त्यांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक आणि विश्वासघात केला.

फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जावरून 15 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.