Dehuroad crime News : कोयत्याच्या धाकाने कपड्यांच्या दुकानात दरोडा; 30 शर्ट, 5 जीन्स पॅंट पळवल्या

एमपीसी न्यूज – कोयत्याचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने कपड्यांच्या दुकानात दरोडा टाकला. दरोड्यात आरोपींनी 30 शर्ट आणि पाच जीन्स पॅंट चोरून नेल्या. हा प्रकार रविवारी (दि. 1) रात्री साडेआठ वाजता देहूरोड मेन बाजार येथे घडला.

ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे (वय 20, रा. उर्सेगाव), विजय उर्फ मुट्ट्या राजू पिल्ले (वय 22), अल्बर्ट सायमन जोसेफ (वय 20), अतिश उर्फ गोंड्या अनिल शिंदे (वय 19), राहुल उर्फ संजय टाक (वय 20, सर्व रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्रिलोक भावनादास हरचंदानी (वय 42, रा. काळेवाडी) यांनी सोमवारी (दि. 2) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रविवारी रात्री लोखंडी कोयते घेऊन मेन बाजार देहूरोड आणि आबू शेठ रोड परिसरात दहशत माजवली. त्यानंतर फिर्यादी हरचंदानी आणि अमित कांबळे यांच्या कपड्यांच्या दुकानात जाऊन काउंटरवर लोखंडी कोयता आपटून जीवे मारण्याची धमकी दिली.

रस्त्याने जाणा-या लोकांना शिवीगाळ केली. कोयत्याचा धाक दाखवून दुकानातून 8 हजार रुपयांचे 30 शर्ट आणि 2 हजारांच्या 5 जीन्स पॅंट चोरट्यांनी दरोडा टाकून चोरून नेल्या. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.