Dehuroad Crime News : व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. त्यामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 16) दुपारी अडीच वाजता देहूरोड भाजी मार्केट येथे करण्यात आली.

व्हिडीओ गेम चालक मालक सौदागर शिवाजी शिंदे (वय 48, रा. देहूरोड), सचिन त्र्यंबक म्हस्के (वय 25, रा. चिखली), जुगार खेळी गोवर्धन सर्जेराव आडागळे (वय 50, रा. देहूरोड), विजय रामपाल दिल्लोड (वय 48, रा. देहूरोड), जावेद शाहबुद्दीन शेख (वय 39, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह व्हिडीओ गेम मालक संदीप टंडण (पूर्ण नाव माहिती नाही, वय 45, रा. देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  देहूरोड येथील भाजी मार्केटशेजारी जय मातादी व्हिडीओ गेम पार्लर आणि जय गणेश व्हिडीओ गेम पार्लर ही दोन दुकाने आहेत. त्यामध्ये व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी दोन्ही दुकानांवर छापा मारला. त्यावेळी आरोपी दुकानातील इलेक्ट्रॉनिक व्हिडीओ गेम मशीनवरील आकड्यांवर पैसे लावून हारजीत जुगार खेळत होते. पोलिसांनी या कारवाईमध्ये एक लाख 25 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.